नागपूर : वाघांची शिकार आणि तस्करीचा धोका टळलेला नसतानाच आता वन्यजीव संरक्षण कायदा १९७२च्या अधिसूची एकमधील ‘कॉमन क्रेन’ या पक्ष्याच्या तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. पश्चिम बंगाल ते मुंबई या मार्गाने होणाऱ्या या तस्करीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील धागेदोरे उघड झाले तरी या प्रकरणातील आरोपींना सशर्त जामीन मिळाल्याने तपासयंत्रणेच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा आणि देवरीदरम्यान पाच ते सहा दिवसांपूर्वी पश्चिम बंगालवरून पाच ‘कॉमन क्रेन’ मुंबईला नेत असताना आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना १६ सप्टेंबपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा >>>पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडलं महिला आरक्षण विधेयक; म्हणाले, “ईश्वराने मला…”

सर्व आरोपी आणि त्यांची वाहने गुजरातमधील होती. यापूर्वीही दोनदा ‘कॉमन क्रेन’ची तस्करी करण्यात आली असून अटकेतील एका आरोपीचा यात सहभाग होता. त्यांच्याकडे बनावट वाहतूक परवाना, प्रस्ताव व संगणकावर तयार करण्यात आलेली बनावट कागदपत्रे सापडली. तसेच सौदी अरेबियातील हॉटेल्सचे ‘व्हिजिटिंग कार्ड’ मिळाले. त्यामुळे ही तस्करी आंतरराष्ट्रीय स्तरावर असल्याचे त्याचवेळी स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणाचा तपासही वाघांच्या तस्करीप्रमाणेच करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही.

तस्करीतून सुटका केलेल्या पक्ष्यांना ‘गोरेवाडा बचाव केंद्रा’त आणले आहे. त्यापैकी एकाचा अतिसारामुळे मृत्यू झाला. आणखी दोघांनाही त्याची लागण झाली आहे.

अधिसूची एकमधील पक्ष्यांच्या तस्करीचे प्रकरण असताना तपासही त्याच दर्जाचा हवा होता. मात्र, आरोपींना अटी व शर्तींवर जामीन मिळाल्याने तपासयंत्रणेतील त्रुटी समोर आल्या. – सावन बाहेकर, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common crane smuggling links to international level amy