खेळाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लैंगिक शोषणाच्या घटनांपैकी एक असलेल्या अमेरिकेतील एका घटनेत अखेर मोठा निर्णय झाला आहे. अमेरिकेच्या खेळाडूंचा डॉक्टर असलेल्या या व्यक्तीने तब्बल ५०० खेळाडूंचं लैंगिक शोषण केलं होतं. हा आरोपी डॉक्टर सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असून त्याच्याविरोधात खटला सुरू होता. अखेर या प्रकरणी आरोपीने लैंगिक शोषण केलेल्या पीडितांना भरपाई म्हणून ३००० कोटी रुपये देण्यावर सहमती झाली आहे. ही सर्व रक्कम पीडितांना दिली जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडितांनी या प्रकरणी ४२५ मिलियन म्हणजेच जवळपास ३३०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मध्यस्थींनी चर्चेतून ३८० मिलियन डॉलर ही नुकसान भरपाई अंतिम केली. यासह युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका (USA) जिमनॅस्टिक आणि लैंगिक शोषण पीडितांमध्ये सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचा शेवट झाला आहे.

खेळाच्या इतिहासातील काळा अध्याय

अमेरिकेतील खेळाडूंच्या लैंगिक शोषणाची ही घटना खेळाच्या इतिहासातील काळा अध्याय आहे. या प्रकरणात पीडितांना देण्यात आलेली आर्थिक भरपाई अशा प्रकरणातील आतापर्यंतची सर्वाधिक भरपाई आहे. ही रक्कम ४ वेळा ऑलिम्पिक विजेती खेळाडू सिमोन बाईल्स, मेकायला मारोनी, एली रईसमनसारख्या सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंसह ५०० खेळाडूंमध्ये वितरित केली जाणार आहे.

या प्रकरणातील अधिवक्ता राशेल डेन होलंडर म्हणाले, “या प्रकरणात महिला खेळाडूंनी जो अत्याचार सहन केला, त्यांना जो त्रास झाला आणि जो त्रास होत आहे त्याची भरपाई कोणतीही आर्थिक रक्कम करू शकत नाही. मात्र, आता या प्रकरणाची चर्चा थांबायला हवी. कारण या महिलांना आता मदतीची गरज आहे. त्यांना आत्ताच ही मदत गरजेची आहे,”

“आरोपी लेरी नासारच्या अत्याचाराचा बळी ठरलेल्या अनेक मुली आणि महिला सध्या नैराश्याच्या शिकार बनल्या आहेत. त्यांना आजही याचे मानसिक परिणाम भोगावे लागत आहेत. त्यांचं मानसिक आरोग्य बिघडलं आहे. काहींनी तर लैंगिक अत्याचारानंतर आत्महत्येचाही प्रयत्न केलाय. या घटना आरोपी नासारने दाबल्या,” असंही राशेल डेन होलंडर यांनी नमूद केलं.

ऑलम्पिक समिती आणि एफबीआयवर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप

हेही वाचा : संतापजनक! पोलिस अधिकार्‍याकडून २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

“एफबीआयने बघ्याची भूमिका घेतली”

दरम्यान, या प्रकरणात पीडित महिला खेळाडूंनी ऑलम्पिक समिती आणि केंद्रीय तपास संस्था एफबीआयवर (FBI) आरोपींवर कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. सिमोन बाईल्सला तर सिनेटसमोर साक्ष देताना अक्षरशः रडू कोसळलं होतं. तिनेच हे गंभीर आरोप केले आहेत. यानंतर आता ऑलम्पिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंची माफी मागत त्यांच्या हिमतीचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Compensation of rs 3000 crore to victims of sexual abuse in america usa gymnastics team pbs