करोनामुळे देशातील आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचं चित्र आहे. रोजच करोना रुग्णांची नकोशी विक्रमी नोंद होत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे करोना रुग्णांची साखळी तोडण्याचं मोठं आवाहन प्रशासनासमोर आहे. करोना लसीकरणाचा वेग वाढवणं देखील महत्त्वाचं आहे. मात्र गेल्या काही दिवसात लसींचा पुरवठा कमी होत असल्याने काही ठीकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी तर रोजच सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका करत आहेत. केंद्र सरकार सर्वच पातळींवर अपयशी ठरल्याचा त्यांनी आरोप केला आहे. त्यात करोना व्हॅक्सिनच्या किंमतीनंतर आत्या त्यावर वसूल करण्यात येण्याऱ्या कराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. शुक्रवारी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून व्हॅक्सिन खरेदीवरील जीएसटी टॅक्स माफ करण्याची विनंती केली होती. त्या मागणीवरून आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
नागरिकांचा जीव जात असताना पंतप्रधान कर वसूल करण्यात मग्न असल्याची बोचरी टीका त्यांनी ट्वीटमधून केली आहे. ‘जनता के प्राण जाए पर PM की टॅक्स वसूली ना जाए’, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर हॅशटॅग जीएसटीचाही वापर केला आहे.
जनता के प्राण जाएँ पर PM की टैक्स वसूली ना जाए!#GST
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 8, 2021
सरकारने परदेशातून येणाऱ्या करोना व्हॅक्सिनवरील जीएसटी माफ केला आहे. मात्र देशात तयार होणाऱ्या व्हॅक्सिनवर जीएसटी आकारला जात आहे. केंद्र सरकारकडून करोना व्हॅक्सिनवर ५ टक्के जीएसटी आकारला जात आहे.
कोविशिल्डच्या एका डोससाठी राज्यांना ३०० आणि कोव्हॅक्सिनच्या एका डोससाठी ४०० रुपये राज्यांना मोजावे लागत आहेत. त्यावर ५ टक्के जीएसटीही आकारला जात आहे. त्यामुळे कोविशिल्ड ३१५ तर कोव्हॅक्सिन ४२० रुपयांना पडत आहे. त्यामुळे राज्यांवर जीएसटीचा अतिरिक्त भार पडत आहे. यासाठी राज्यांकडून आता जीएसटी माफ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.