Madhya Pradesh school paint scam : देशात सरकारी कामात घोटाळा झाल्याचे अनेकदा पाहायला मिळते, मात्र मध्यप्रदेशमधील एका शाळेत झालेल्या घोटाळ्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. मध्यप्रदेशच्या शाहडोल जिल्ह्यातील साकंदी गावातील एका सरकारी शाळेत एका भिंतीला चार लिटर रंग देण्यासाठी १६८ कामगार आणि ६५ गवंडी वापरण्यात आल्याचा आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर या कामाच्या बिलाची सध्या जोरदार चर्चा होत आहे

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बिलानुसार, फक्त चार लिटर ऑईल पेंट शाळेतील एका भिंतीवर लावण्यासाठी १.०७ लाख रुपये आकारण्यात आले आहेत. तर याव्यतिरिक्त निपानिया या गावात २० लिटर पेंट लावण्यासाठी २.३ लाख रुपयांचे बिल वसूल करण्यात आले आहे

साकंदी गावातील कामासाठी १६८ कामगार आणि ६५ गवंडी वापरण्यात आले असा उल्लेख बिलावर केलेला आहे आणि निपानिया येथे १० खिडक्या आणि चार दरवाजांना रंग देण्यासाठी २७५ कामगार आणि १५० गंवडी कामावर ठेवण्यात आले होते.

पण सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हे काम करणाऱ्या सुधाकर कन्स्ट्रक्शन या बांधकाम कंपनीने ५ मे २०२५ रोजीच एक बिल तयार केले होते, ज्याची पडताळणी एक महिना आधी म्हणजे ४ एप्रिल रोजी, निपानिया शाळेच्या मुख्याध्यापकांनी केली होती.

यापेक्षाही गंभार बाब म्हणजे, बिलाबरोबर काम करण्याच्या आधीचे आणि नंतरचे फोटो जोडणे आवश्यक असतात, पण हे बिल फोटोंशिवाय मंजूर करण्यात आले.

दरम्यान हा संपूर्म प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी फूल सिंग मारपाची म्हणाले की, “या दोन्ही शाळांची बिले सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. त्यांची चौकशी केली जात आहे, समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे कारवाई केली जाईल.”