भारतात गेल्या दोन दिवसांपासून नवीन करोना बाधितांच्या संख्येची स्थिती स्थिर आहे. देशात दररोज करोनाची सुमारे ४० हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. शनिवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ३८,०७९ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आणि ५६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,९४९ आणि गुरुवारी ४१,८०६  करोना बाधित आढळून आले होते. त्याचबरोबर, गेल्या २४ तासांत ४३,९१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे, म्हणजेच ६३९७ सक्रिय रुग्णांमध्ये घट झाली आहे.

देशात सध्या  चार लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात अद्याप ४ लाख २४ हजार करोनाबाधित उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण ४ लाख १३ हजार ९१ जणांचा मृत्यू झाला आहे. चांगली गोष्ट अशी की आतापर्यंत एकूण ३ कोटी २ लाख २७ हजार लोकांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी १० लाख ६४ हजार लोकांना करोना संसर्ग झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, १६ जुलै पर्यंत देशभरात करोना लसीचे ३९ कोटी ९६ लाख ९५ हजार डोस देण्यात आले आहेत. शुक्रवारी ४२ लाख १२ हजार लसी देण्यात आल्या. त्याचबरोबर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नुसार आतापर्यंत ४४ कोटी २० लाख करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. शुक्रवारी १९.९८ लाख करोना चाचण्या घेण्यात आल्या, ज्यांचा सकारात्मकता दर ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

राज्यात शुक्रवारी नव्याने आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा करोनावर मात केलेल्या रुग्णांचा आकडा हा जवळपास दुप्पट असल्याचं दिसून आलं आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण ७ हजार ७६१ नवे करोनाबाधित आढळले असून त्या तुलनेत १३ हजार ४५२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

बऱ्या झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीनंतर राज्यात आजपर्यंत करोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांचा आकडा आता ५९ लाख ६५ हजार ६४४ इतका झाला आहे. राज्यात करोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६१ लाख ९७ हजार १८ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख १ हजार ३३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.