Coronavirus Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठी घोषणा केली असून संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. हा लॉकडाउन २१ दिवसांसाठी असणार आहे. म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन सुरु असणार आहे. यादरम्यान लोकांना घराबाहेर पडता येणार नाही. नरेंद्र मोदींनी घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नका नका असं आवाहन करताना करोना रुग्णांच्या उपचारासाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली.
Highlights
हे २१ दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून जर आपण योग्य पालन केलं नाही तर आपण २१ वर्ष मागे ढकलले जाऊ अशी भीती नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे.
अनेक अफवा अशावेळी पसरतात. कृपया कोणतीही अफवा पसरवू नका आणि त्यापासून सावध राहा. राज्य सरकार, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नका. तुमचा जीव धोक्यात घालू नका. प्रत्येक नागरिक नियमांचं पालन करेल अशी अपेक्षा आहे. २१ दिवसांचा लॉकडाउन मोठा कार्यकाळ आहे. पण तुमच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचं असून हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक भारतीय याचा सामना करेल आणि विजय प्राप्त करेल याची खात्री आहे. आपली आणि आपल्या लोकांची काळजी घ्या. कायद्याचं पालन करा. विजयाचा संकल्प करत ही बंधने स्विकारा - नरेंद्र मोदी
करोना रुग्णांच्या उपचारासाठी आरोग्य व्यवस्थेसाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे - नरेंद्र मोदी
घरात असताना त्या लोकांचा विचार करा जे आपलं कर्तव्य निभावताना स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहेत. प्रत्येक माणसाचा जीव वाचवण्यासाठी ते रुग्णालयांमध्ये काम करत आहेत. वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी यांचाही विचार करा. तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी झटणाऱ्यांसाठी प्रार्थना करा. केंद्र आणि राज्य सरकार वेगाने काम करत आहेत. लोकांना असुविधा होऊ नये यासाठी सतत प्रयत्न करत आहे. जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होईल यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. संकटाची ही वळ गरिबांसाठी कठीण आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.
काही देशांनी करोनावर नियंत्रण मिळवलं आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. या देशातील नागरिक अनेक आठवडे घराबाहेर पडले नाहीत. या नागरिकांनी सर्व सूचनांचं पालन केलं. आपणही आपल्या समोर फक्त हा एकच मार्ग आहे असं समजलं पाहिजे. आपल्याला घरातून बाहेर निघायचं नाही. काहीही झालं तरी घरात राहायचं आहे. पंतप्रधान ते गावातील छोट्या नागरिकांपर्यंत प्रत्येकाने सोशल डिन्स्टन्सिंग पाळलं पाहिजे. घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नका. करोनाची साखळी तोडायची आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं
लागण झालेली एक व्यक्ती फक्त आठवडा आणि १० दिवसांत शेकडो लोकांपर्यत हा आजार पोहोचवू शकतं. आगीप्रमाणे हा आजार पसरतो. करोनाची लागण झालेल् एक लाखांपर्यंत पोहोचण्यासाठी ६७ दिवस लागले. पण नंतर ११ दिवसांत फक्त एक लाख लोकांना लागण झाली. यानंतर तीन लाख लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त चार दिवस लागले अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. एकदा फैलाव सुरु झाला की याला रोखणं अशक्य होऊन जातं. यामुळेच चीन, अमेरेका, जपान, स्पेन, इराक, इटलीसारख्या अनेक देशांत जेव्हा हा व्हायरस पसरु लागला तेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
नरेंद्र मोदी यांनी करोनाचा अर्थ सांगताना त्याचा अर्थ कोई रोड पर ना निकले असं असल्याचं सांगत एक पोस्टर दाखवलं.
हा लॉकडाउन पुढील २१ दिवसांसाठी असणार आहे असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत लोकांना घराबाहेर पडता येणार नाही.
अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. याला गांभीर्याने घेतलं पाहिजे. आज रात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करत आहोत
काही लोकांना सोशल डिन्स्टन्सिंग फक्त रुग्णांसाठी आहे असं वाटत आहे. पण हे चुकीचं आहे. कुटुंबातील प्रत्येकाला हे लागू आहे. पंतप्रधानांही लागू आहे. एक चुकीचा विचार तुमच्या कुटुंबातील, मित्रांना आणि संपूर्ण देशाला धोक्यात घालत आहे. जर असंच सुरु राहीलं तर भारताला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. त्याचा अंदाज लावणंही कठीण आहे.
करोनासंंबधी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून सर्वांना माहिती मिळत आहे. अनेक बलवान देशांनाही करोनाचा फटका बसला आहे. हे देश प्रयत्न करत नाही किंवा सुविधा उपलब्ध नाही असं नाही. पण करोना व्हायरस इतक्या वेगाने पसरत आहे की कितीही तयारी केली तरी या देशांमध्ये आव्हान वाढत आहे. या सर्व देशांच्या दोन महिन्यांच्या प्रयत्नातून जो निष्कर्ष समोर येत आहे त्यानुसार करोनाशी लढा देण्यासाठी सोशल डिन्स्टन्सिंग हा एकमेक पर्याय आहे.
जनता संचारबंदीला जतनेने चांगला प्रतिसाद दिला. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने या परीक्षेत चांगली कामगिरी केली आणि यश मिळवून दिलं. भारताने देशावर संकट येतं तेव्हा कशा पद्धतीने आम्ही एकत्र याचा सामना करतो हे दाखवून दिलं आहे असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वीही त्यांनी देशातील जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी देशवासीयांना जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं होतं. आज नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे देशाचं लक्ष आहे
संचारबंदी लागू असतानाही उल्लंघन करणाऱ्या ११ जणांना अटक करण्यात आली आहे. तर २३२ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पंजाब सरकारने ही माहिती दिली आहे.
करोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही स्वयंसेवी संस्था, लोक, धार्मिक स्थळे मदतीसाठी पुढे येत असल्याचं सांगत त्यांचे आभार मानले. उद्धव ठाकरेंनी यावेळी मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाचा उल्लेख केला. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्याकडून सिद्धिविनायक मंदिर, शिर्डी साई मंदिराचाही उल्लेख केला. उद्धव ठाकरेंनी लालबागचा राजाचा उल्लेख करताना म्हटलं की, 'लालबागच्या राजाने अनोखा कार्यक्रम हाती घेतला आहे. हे दिवस रक्तदान करण्याचे आहेत. आपल्याकडे रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. लालबागचा राजाने यासाठी पुढाकार घेतला आहे त्याबद्दल त्यांचे आभार'.
बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
राज्यात काल रात्रीपासून कोरोनाच्या १८ नविन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १०७ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबईचे ६, सांगली मधील इस्लामपूरचे ४, पुण्याचे ३, सातारा जिल्ह्यातील २ तर अहमदनगर, कल्याण - डोंबिवली आणि ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या नवीन बाधित रुग्णांपैकी सर्वाधिक म्हणजे ८ रुग्णांनी मध्यपूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला आहे. तर इतर काही जणांनी अमेरिका, इंग्लंड आणि पेरु या देशात प्रवास केला आहे. दोन जण पूर्वी बाधित आढळलेल्या रुग्णाचे निकट सहवासित आहेत असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या गाड्यांची अडवणकू करु नका. यंत्रणांवर ताण वाढवू नका. शक्यतो घराबाहेर पडू नका. काय मदत करु विचारणाऱ्यांना मी घरा राहा असंच सांगतो. आपण यशस्वीपणे यावर मात करु. तुमचं सहकार्य असंच देत राहा. संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे.
आपण जगणं थांबवलेलं नाही. फक्त त्याची शैली बदलली आहे. नागरीक कशासाठी बाहेर पडले आहेत याची पोलिसांनी खात्री करावी. नागरिकांनीही उगाच घराबाहेर पडू नये. कृषीविषयक सर्व सेवा सुरु राहणार आहेत. मला पोलिसांचे आभार मानायचे आहेत. काही लाख मास्क त्यांनी धाड टाकून जप्त केले. अशीच कामगिरी त्यांच्याकडून अपेक्षित आहे. कुठेही काळाबाजार होता कामा नये. आपण अजिबात काळजी करण्याची गरज नाही. पुरेसा अन्नसाठा आहे. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्था, व्यक्ती, मंदिर मदतीसाठी पुढे येत आहेत. लालबागच्या राजाने अनोखा कार्यक्रम घेतला आहे. हे दिवस रक्तदान करण्याचे आहेत. आपल्याकडे रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. लालबागच्या राजाने यासाठी पुढाकार घेतला आहे त्याबद्दल त्यांचे आभार.
उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधत सहकार्य करण्याचं आवाहन केलं. सर्वांनी समजूतदारपण दाखवणं गरजेचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमान सेवा बंद करण्यात येत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आटोकाट प्रयत्न सुरू असताना रस्त्यावरील रहदारी सुरूच असल्याचं चित्र आहे. अनेक जण रस्त्यावर गाड्या घेऊन फिरत असल्याचं त्याचबरोबर पेट्रोल पंपवर गर्दी होत असल्याचं दिसून आल्यानं पुणे शहरासह जिल्ह्यात सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
विदर्भ डेली न्यूजपेपर असोसिएशनचा महत्वाचा निर्णय. उद्यापासून ३१ तारखेपर्यंत वर्तमानपत्राचे वाटप न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मागच्या २४ तासात स्पेनमध्ये करोना व्हायरसमुळे ५१४ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे स्पेनमध्ये आतापर्यंत २,६९६ जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये ४० हजार लोकंना या धोकादायक विषाणूची लागण झाली आहे.
मागच्या ४० तासात दिल्लीमध्ये करोना व्हायरसची लागण झालेला एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. करोनाच्या ३० रुग्णांपैकी काही जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आताफक्त करोनाचे २३ रुग्ण आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्रात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. सहा नव्या रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात मुंबईतील पाच आणि एक नगरमधला रुग्ण आहे.
करोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सुरू असलेल्या काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. ऑलिम्पिक स्पर्धादेखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. या दरम्यान करोनाग्रस्तांसाठी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मदतीचा हात दिला आहे.
शेअर बाजारासाठी आजचा दिवस सकारात्मक ठरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७८०० च्या पुढे बंद झाला तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६,६७४ वर बंद झाला. त्यात ६९२ अंकांची वाढ झाली. करोना व्हायरसमुळे मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजारात पडझड सुरु आहे.
बँकेतील बचत खात्यातील किमान बॅलन्सवर आकारले जाणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा निर्मला सीतारमन यांनी केली तसेच डेबिट कार्ड धारक पुढचे तीन महिने दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतात.
शहरातून गावाकडे जाणाऱ्या विशेषतः पुणे, मुंबईतील नागरिकांकडे संशयानं बघितलं जात आहे. अनेक ठिकाणी या नागरिकांना तपासणी करून प्रवेश दिला जात आहे. तर काही गावांमध्ये प्रवेश बंदीच केली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला आवाहन केलं आहे. शहरातून येणाऱ्या आपल्या माणसांसोबत माणुसकीनं वागा. त्यांच्याकडे संशयानं बघू नका, असं टोपे म्हणाले.
करोनाला पायबंद घालण्यासाठी केंद्रासह राज्य सरकारनं सक्तीची पावलं उचलली आहेत. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्या घाईत सुरक्षित ठिकाण म्हणून शहरातील नागरिकांना गावाकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे. पण, शहरातील नागरिकांविषयी गावांमध्ये भीतीचं वातावरण असून, अनेक ठिकाणी गावबंदीच घालण्यात आली आहे.
आज मध्यरात्रीपासून देशांतर्गत विमान उड्डाणे ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. या काळातील कर्मचाऱ्यांचे वेतन अजिबात कापणार नाही असे आश्वासन इंडिगोने आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहे. करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
करोनामुळे देशावर मोठे संकट निर्माण केले आहे. त्यामुळे काही क्षेत्रांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत काही मोठ्या घेषणा केल्या. यामध्ये ३० जून पर्यंत आयकर परतावा भरण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत गोव्यात पूर्णपणे लॉकडाउन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय. देशभरात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी, गोव्यात पर्यटकांची गर्दी कमी झाली नव्हती.
लोकांना घरामध्ये ठेवण्यासाठी आवश्यक असल्यास कर्फ्यू लावा, केंद्राचा राज्य सरकारांना सल्ला, भारताच्या जनता कर्फ्यूचे अमेरिकेने कौतुक केले आहे.
करोनामुळे लॉकडाउन असल्याने अनेक उद्योगांचे नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक पॅकेज देण्यासाठी सरकार तयार असल्याचे म्हटले आहे. दुपारी दोन वाजता त्या यासंबंधी माध्यमांना माहिती देतील.
करोनावरुन पसरणाऱ्या अफवा रोखण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत महत्वाचे आवाहन केले आहे. व्हाट्सअँप, फेसबुक या सोशल माध्यमांवरुन अफवा पसरवल्या जात असल्याने हे महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात करोना व्हायरसच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आणखी पाच खासगी लॅबना मान्यता देण्यात आली आहे. देशभरात एकूण १२ खासगी प्रयोगशाळांना करोना चाचणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात कस्तुरबा रूग्णालयात करोनाचा चौथा बळी गेला आहे. कस्तुरबा रूग्णालयात दाखल असलेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांना काल संध्याकाळपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता
बाजार समित्या बंद राहणार नाहीत, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात सहा महिने पुरेल उतका अन्नधान्य साठा उपलब्ध आहे. राज्तात सामान घअयायला कोणीही गर्दी करू नये. सरकार आपल्या पद्धतीनं काम करतंय. लोकांनीही सहकार्य करावं. काळा बाजर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशा इशाराही त्यांनी दिला आहे.
राज्यातील १२ रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यांचे नवे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना आता पुढील काही दिवसांसाठी होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे.