करोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काही स्वयंसेवी संस्था, लोक, धार्मिक स्थळे मदतीसाठी पुढे येत असल्याचं सांगत त्यांचे आभार मानले. उद्धव ठाकरेंनी यावेळी मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाचा उल्लेख केला. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्याकडून सिद्धिविनायक मंदिर, शिर्डी साई मंदिराचाही उल्लेख केला.

उद्धव ठाकरेंनी लालबागचा राजाचा उल्लेख करताना म्हटलं की, “लालबागच्या राजाने अनोखा कार्यक्रम हाती घेतला आहे. हे दिवस रक्तदान करण्याचे आहेत. आपल्याकडे रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. लालबागचा राजाने यासाठी पुढाकार घेतला आहे त्याबद्दल त्यांचे आभार”.

उद्धव ठाकरेंनी यावेळी पोलिसांचेही आभार मानले. “नागरिक कशासाठी बाहेर पडले आहेत याची पोलिसांनी खात्री करावी. नागरिकांनीही उगाच घराबाहेर पडू नये. कृषीविषयक सर्व सेवा सुरु राहणार आहेत. पण मला पोलिसांचे आभार मानायचे आहेत. काही लाख मास्क त्यांनी धाड टाकून जप्त केले. अशीच कामगिरी त्यांच्याकडून अपेक्षित आहे,” असं त्यांनी म्हटलं. आपण जगणं थांबवलेलं नाही. फक्त त्याची शैली बदलली आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या गाड्यांची अडवणकू करु नका. यंत्रणांवर ताण वाढवू नका. शक्यतो घराबाहेर पडू नका. काय मदत करु विचारणाऱ्यांना मी घऱी राहा असंच सांगतो. आपण यशस्वीपणे यावर मात करु. तुमचं सहकार्य असंच देत राहा. संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे,” असं यावेळी त्यांनी म्हटलं.