Crime News : अविवाहित आहे आणि ब्राह्मण आहे असं सांगत एका मुलीने लग्न केलं. त्यानंतर नवऱ्याच्या घरी गेल्यावर तिच्या तोंडून या अल्लाह, अल्लाह की कसम असे शब्द आले. ज्यामुळे घरातले लोक चकित झाले. त्यानंतर कळलं की जिला लग्न करुन घरी आणलं आहे ती मुलगी मुस्लीम आहे. शिवाय ती पाच वर्षांच्या मुलाची आई आहे. यानंतर काय करावं हा विचार कुटुंब करत असतानच घरातले अडीच लाख रुपये घेऊन ही महिला फरार झाली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. ही घटना इंदूरमध्ये घडली आहे. पीडित पुरुषाच्या कुटुंबाने परशुराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे आणि पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार केली आहे.
नेमकी काय घटना घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील इंदूर या ठिकाणी गांधी नगर पोलीस ठाण्याच्या हिंगोनिया गावात ही घटना घडली. या गावात राहणाऱ्या एका तरुणाचं लग्न व्हायचं होतं. त्यामुळे तरुणाचं कुटुंब स्थळं पाहात होतं. या दरम्यान या तरुणाच्या भावाची ओळख मुकेश नावाच्या एका व्यक्तीशी झाली. यानंतर त्याने २० हजार रुपये घेऊन आष्टा या ठिकाणी राहणाऱ्या मुलीबाबत माहिती दिली आणि तिच्याशी भेट घालून दिली. २६ फेब्रुवारी २०२४ ला या दोघांचं लग्नही ठरलं होतं. दोघांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली. पण इंदूरला येताना या मुलीचा अपघात झाला. त्यानंतर हे लग्न मोडलं. यानंतर मुकेशने कोमल पठाण आणि नेहा अशा दोन मुलींशी या तरुणाची ओळख करुन दिली. कोमलने अडीच लाख रुपये घेतले आणि त्यानंतर नेहा ही मुलगी ब्राह्मण आहे तसंच अविवाहित आहे असं सांगितलं. या तरुणाची भेट ज्या मुलीशी झाली तिने तिचं नाव निकिता आहे असं सांगितलं. यानंतर या दोघांची ओळख झाली. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर काही दिवसांतच मुलीच्या तोंडून बोलताना या अल्लाह आणि अल्लाह कसम असे उल्लेख आहे. यानंतर कुटुंबाला या मुलीवर संशय आला. तिला त्यांनी तू असं का म्हणते आहेस विचारलं असता या मुलीने आपलं नाव निकिता नसून नाजिया आहे आणि मी मुस्लीम आहे असं सांगितलं. तसंच मला एक मुलगा आहे अशीही माहिती तिने दिली.
घडल्या प्रकारानंतर तरुणाने साधला कोमल पठाणशी संपर्क
तरुणाने कोमल पठाणशी संपर्क केला. त्यानंतर कोमल पठाण या तरुणाच्या घरी आली आणि नाजियाला बरोबर घेऊन गेली. त्यानंतर तीन दिवसांनी नाजिया तिच्या घरी आली आणि नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना सांगितलं की कोमलने माझं दुसऱ्या घरी लग्न लावून दिलं आहे. त्यानंतर या शानू नावाच्या एका व्यक्तीने निकिता उर्फ नाजियाच्या पतीला फोन केला आणि सांगितलं की नाजियाचा विवाह माझ्याशी झाला आहे. मी तिचा पती आहे आणि आमचा पाच वर्षांचा मुलगा आहे. हे ऐकून तरुण आणि त्याचं कुटुंब यांना धक्काच बसला. आज तकने हे वृत्त दिलं आहे.
नाजियाने घरातल्या वस्तू आणि पैसे घेऊन केला पोबारा
यानंतर नाजियाने घरातल्या वस्तू, तिचं सामान आणि पैसे घेऊन पोबारा केला. नाजिया आणि तिचं कुटुंब कुठे आहे याचा शोध या युवकाने घेतला. तो तिच्या घरीही जाऊन पोहचला. त्यावेळी नाजिया त्याला म्हणाली जे झालं ते विसरुन जा नाहीतर परिणाम वाईट होतील. त्यानंतर या तरुणाने परशुराम सेनेला सगळा प्रकार सांगितला. परशुराम सेनेने मग पोलिसात धाव घेतली आणि या तरुणाच्या कुटुंबानेही पोलिसांना घडला प्रकार सांगितला. वकील नमन दुबे यांनी सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आहे. मात्र अद्याप नाजियाच्या विरोधात कारवाई केलेली नाही. तपास अधिकारी दीपक पाटील म्हणाले की आम्हाला फसवणुकीच्या या प्रकाराची माहिती मिळाली आहे आम्ही या प्रकरणी तपास करत आहोत.