भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला असून मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार टीका केली आहे. इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुन अप्रत्यक्षपणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर स्वामी यांनी निशाणा साधलाय. अर्थसंकल्पामधील वित्तीय तूट अर्थमंत्रालय इंधनदरवाढ करुन भरुन काढत असल्याचा दावा करत स्वामी यांनी हे असं करणं म्हणजे आर्थिक परिस्थिती हाताळण्याची क्षमता नसल्याचं लक्षण असल्याचा टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वामी यांनी आज सकाळी ट्विटरवरुन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याअंतर्गत येणाऱ्या अर्थमंत्रालयावर थेट शब्दांमध्ये ट्विटरवरुन निशाणा साधलाय. स्वामी यांनी ट्विटरवरुन इंधनदरवाढीमुळे देशामध्ये अराजक माजेल अशी भीती व्यक्त केलीय. “रोज पेट्रोल, डिझेल आणि केरोसीनच्या दरांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे देशात उठाव निर्माण होण्यासारखी परिस्थिती तयार होत आहे,” असं स्वामी म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी अर्थमंत्रालय जबाबदार असून त्यांच्या वैचारिक दारिद्रयामुळेच हे अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. “असं करणं हे अर्थमंत्रालयाचं वैचारिक दारिद्रय आहे. तसेच हा देशद्रोह आहे,” असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे “अर्थसंकल्पातील तूट ही अशापद्धतीने दरवाढ करुन भरुन काढणे हे आर्थिक परिस्थिती हाताळण्याची क्षमता नसल्याचं लक्षण आहे,” असा टोला स्वामींनी लगावलाय.

काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रशियाकडून स्वस्तात मिळणारं कच्च तेल घेण्यास पाठिंबा दर्शवला होता. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह मित्रराष्ट्रांनी रशियावर मोठे आर्थिक निर्बंध लादले. रशियाच्या कच्चा तेलाची खरेदीही थांबवण्यात आली. या पार्श्वभूमीवर रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल देऊ केले. याच पार्श्वभूमीवर बोलताना निर्मला यांनी, “माझ्यासाठी देशाची उर्जा सुरक्षा पहिल्या प्राधान्यावर आहे. जर सवलतीच्या दरात इंधन मिळत असेल तर आम्ही ते का खरेदी करू नये? आम्ही रशियाकडून इंधन खरेदीला सुरुवात केली आहे. आम्हाला भरपूर प्रमाणात तेल मिळाले आहे,” असं म्हटलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily rise in petrol diesel and kerosene prices is intellectual bankruptcy of the finance ministry says subramanian swamy scsg