Dassault Aviation CEO on Rafale Use in Operation Sindoor : पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबवलं. याअंतर्गत भारतीय वायूदलाने लढाऊ विमानांद्वारे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बवर्षाव केला. यामध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त झाले. मात्र, या हल्ल्याला पाकिस्तानी वायू दलाने जशास तसं प्रत्युत्तर देत भारताचं राफेल हे लढाऊ विमान पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. हा दावा आता राफेल विमान बनवणारी फ्रेंच कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने फेटाळून लावला आहे.
फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशन कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपियर म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर या मोहिमेदरम्यान भारताने एक राफेल विमान गमावलं आहे. मात्र, ते कुठल्याही हल्ल्यामुळे नव्हे तर विमान खूप उंचीवर असताना त्यातील तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं.” दरम्यान, पाकिस्तान राफेल विमान पाडल्याचा कुठलाही पुरावा देऊ शकलेला नाही.
पाकिस्तानने केवळ दावे केले
भारत व पाकिस्तानच्या लष्करांमध्ये ७ मे रोजी संघर्ष झाला होता. त्यावेळी भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानविरोधात मोहीम उघडली होती. यादरम्यान, पाकिस्तानी वायूदलाने दावा केला की त्यांनी भारतीय वायूदलाची पाच लढाऊ विमानं पाडली आहेत. यामध्ये तीन राफेल फायटर जेट्सचा समावेश आहे. पाकिस्तानने म्हटलं होतं की “राफेलविरोधात आम्ही जे-१०सी ही मल्टी-रोल लढाऊ विमानं वापरली. या विमानांमधील पीएल-१५ई लाँग रेंज क्षेपणास्त्रांचा मारा करून आम्ही तीन राफेल विमानं पाडली आणि दोन इतर लढाऊ विमानं नष्ट केली.” मात्र, पाकिस्तानने केवळ दावे केले. पाकिस्तानी वायूदल अथवा तिथलं सरकार हे दावे सिद्ध करणारे पुरावे देऊ शकलं नाही.
शत्रूहल्ल्यामुळे विमानाचं नुकसान झालं नाही :एरिक ट्रॅपियर
एरिक ट्रॅपियर यांनी पाकिस्तानचे सर्व दावे निराधार असल्याचं म्हटलं आहे. फ्रेंच संकेतस्थळ Avion Chasse ने ट्रॅपियर यांचा हवाला देत म्हटलं आहे की भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान एक राफेल विमान क्षतीग्रस्त झाल्याचं वृत्त खरं आहे. मात्र, शत्रूच्या हल्ल्यामुळे विमानाला काही झालं नाही. विमान खूप उंचीवर असताना त्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो अपघात झाला. दसॉल्टच्या स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टिमनेही या वृत्ताची पुष्टी केली आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान विमान खूप उंचीवर असताना ही घटना घडली आहे. कुठल्याही शत्रू हल्ल्यामुळे विमानाचं नुकसान झालेलं नाही.