तीन वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये अटक करण्यात आलेला दाऊद इब्राहिम कासकरचा पुतण्या सोहेल कासकर हा आता फरार झाल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सोहेल कासकरला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. भारतीय तपास यंत्रणा, मुंबई पोलीस यासाठी अमेरिकेतील तपास यंत्रणांच्या संपर्कात होते. मात्र, त्यानंतर देखील सोहेल कासकर फरार झाला असून तो दुबईमार्गे पाकिस्तानमध्ये जाऊन पोहोचल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे दहशतवादी कारवाया आणि दाऊद इब्राहिमच्या डी गँगविरोधातील मुंबई पोलिसांच्या मोहिमेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.
२०१८ साली सोहेल कासकरला अमेरिकेच्या नार्को टेररिजम विभागाकडून स्पेनमध्ये सापळा रचून अटक करण्यात आली होती. त्याला भारतात आणण्याचा प्रयत्न भारतीय तपास यंत्रणा आणि मुंबई पोलिसांकडून सुरू होता. मात्र, मुंबई पोलिसांनी इंटरसेप्ट केलेल्या फोनकॉल्समधून सोहेल कासकर पाकिस्तानातून बोलतोय असं समोर आलं. त्यानंतर सोहेल कासकर अमेरिकेतून दुबईमार्गे पाकिस्तानला पळून गेल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेने त्याला सोडल्याची देखील चर्चा सुरू आहे.
सोहेल कासकर हा भारतात वाँटेड होता. मुंबई पोलीस त्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी अमेरिकेतील तपास यंत्रणांच्या संपर्कात देखील होते. मात्र, नुकतेच मुंबई पोलिसांना मिळालेल्या फोनकॉल्स संभाषणातून सोहेल कासकर दुबईमार्गे पाकिस्तानात जाऊन पोहोचल्याचं समोर आलं आहे.
या प्रकारामुळे आता भाजपाकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. “दाऊद इब्राहिम कासकरचा पुतण्या सोहेल कासकर फरार झाला आहे. दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला हा मोठा फटका आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या प्रीति गांधी यांनी ट्विटरवर दिली आहे.