पीटीआय, शिमला
हिमाचल प्रदेशात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन, ढगफुटी आणि घरांची पडझड यांसारख्या घटनांमुळे मृतांची संख्या ५३ झाली आहे. शिमला येथील ढासळलेल्या शिवमंदिरातून मंगळवारी आणखी दोन मृतदेह सापडले असून समरहिल आणि फागली येथील दुहेरी भूस्खलनाच्या ठिकाणी सापडलेल्या मृतदेहांची एकूण संख्या १६ झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शिमल्याच्या समरहिल आणि फागलीमध्ये अजूनही १० जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि लष्करासह पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) सकाळी सहाच्या सुमारास समरहिल येथे पुन्हा बचावकार्य सुरू केले, असे शिमल्याचे उपायुक्त आदित्य नेगी यांनी सांगितले. विविध ठिकाणी सोमवारी रात्री मुसळधार पावसामुळे बचावकार्य थांबवण्यात आले. सोमवारपासून एकूण १६ मृतदेह सापडले आहेत, शिव मंदिरात ११ आणि फागली येथे पाच मृतदेह सापडले आहेत. शिमल्यातील या शिवमंदिरात सकाळी ७.१५ वाजता ही दुर्घटना घडली. श्रावण महिन्याचा सोमवार असल्याने या मंदिरात सकाळी प्रार्थनेसाठी भाविकांनी गर्दी केली होती.
सोमवारी मंडी जिल्ह्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला, असे उपायुक्त अिरदम चौधरी यांनी सांगितले. सेघली पंचायतीत रविवारी रात्री उशिरा भूस्खलनात दोन वर्षांच्या मुलासह एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला, तर पांडोहजवळील संभळ येथे सहा मृतदेह सापडले. सोलन जिल्ह्यात अकरा जणांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री जदोन गावातील दोन घरे वाहून गेल्याने ढगफुटीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि रस्ते अडवल्यामुळे हिमाचल प्रदेश विद्यापीठाने १९ ऑगस्टपर्यंत शैक्षणिक उपक्रम स्थगित केले आहेत. विद्यापीठाचे ग्रंथालयही २० ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे.
राज्यातील १२ पैकी ११ जिल्ह्यांतील ४,२८५ ट्रान्सफॉर्मर आणि ८८९ पाणीपुरवठा योजना विस्कळीत.
८५७ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
राज्य आपत्कालीन विभागानुसार २४ जून रोजी मोसमी पाऊस सुरू झाल्यापासून १४ ऑगस्टपर्यंत राज्याचे ७,१७१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
या पावसाळय़ात राज्यात ढगफुटी आणि भूस्खलनाच्या एकूण १७० घटना घडल्या असून सुमारे ९,६०० घरांचे नुकसान झाले आहे.