चंडीगड : ‘‘मिग-२१’ हे केवळ लढाऊ विमान आणि यंत्र नाही, तर देशाचा अभिमान आहे. भारत आणि रशियामधील दृढ संबंधांची साक्ष यातून मिळते,’ असे गौरवास्पद उद्गार संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी काढले.

चंडीगड हवाई तळावर ‘मिग-२१’ विमानांना शुक्रवारी अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात राजनाथसिंह बोलत होते. देशाचा अभिमान आणि हवाई दलाचा कणा असलेले ‘मिकोयान गुरेव्हिच’ अर्थात मिग-२१ लढाऊ विमानांनी शुक्रवारी आकाशात अखेरची भरारी घेतली. या विमानांचा ६२ वर्षांचा प्रवास या उड्डाणाने थांबला. १९६०च्या दशकापासून ही विमाने हवाई दलाच्या ताफ्यात होती.

राजनाथसिंह म्हणाले, ‘‘मिग-२१’चा ६० वर्षांहून अधिक काळाचा प्रवास असामान्य आहे. अनेक दशके या विमानांनी देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पेलली. आपला आत्मविश्वास वाढविला आणि सामरिक नीतीला बळ आणले. या विमानांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. या क्षणी मी तुमच्यासारखाच भावनिक आणि कृतज्ञ आहे. ‘मिग-२१’ला आपण निरोप देत आहोत. ‘मिग-२१’चा हा अध्याय लष्करी उड्डाणशास्त्रामध्ये सुवर्णाक्षरात लिहिला जाईल.’

सिंह म्हणाले, ‘हे केवळ लढाऊ विमान नाही, तर भारत-रशियामधील दृढ संबंधांची साक्ष आहे. या विमानांमुळे अनेक अभिमानाचे क्षण देशाला पाहायला मिळाले. जगाच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने एखाद्या विमानाची निर्मिती झालेली नाही. जगभरात ११,५०० मिग विमाने तयार केली गेली. यापैकी ८५० लढाऊ विमाने भारताच्या हवाई दलाच्या ताफ्याचा भाग राहिली. ही संख्या या विमानांची लोकप्रियता, विश्वासार्हता आणि बहुउद्देशीय क्षमता दाखवून देते.’

१९७१चे भारत-पाकिस्तान युद्ध, १९९९ चे कारगिल युद्ध, २०१९ मधील बालाकोट येथील हवाई हल्ले, ऑपरेशन सिंदूरमध्ये विमानांनी यशस्वी कामगिरी बजावली. १९७१मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात ‘मिग-२१’ विमानांनी ढाक्यामध्ये ‘गव्हर्नर हाउस’ला लक्ष्य केले होते. तो या युद्धाचा निर्णायक क्षण होता. राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

‘सध्याची विमाने ४० वर्षांपूर्वीची’

राजनाथसिंह म्हणाले, ‘ज्या वेळी मिग-२१ विमानांची चर्चा होते, तेव्हा ही विमाने ६० आणि ७०च्या दशकातील असल्याचे सांगितले जाते. मी या ठिकाणी एक बाब स्पष्ट करू इच्छितो, की हवाई दलाच्या वापरात असलेली सध्याची मिग-२१ विमाने ४० वर्षे जुनी आहेत. ६० आणि ७०च्या दशकात असलेल्या विमानांनी यापूर्वीच आपली सेवा थांबविली आहे. वापरात असलेली मिग-२१ विमानांना तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत ठेवले होते.’

समारंभपूर्वक निरोप

– मिग-२१ विमानांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी मिग-२१ बायसन लढाऊ विमान उडवले.

– दिलबाग सिंग यांनी १९६३ मध्ये या विमानांच्या पहिल्या स्क्वाड्रनचे चंडीगड येथेच नेतृत्व केले होते. दिलबाग सिंग नंतर १९८१ मध्ये हवाई दलाचे प्रमुख झाले.

– वैमानिकांनी तीन मिग-२१ विमानांतून ‘बादल फॉर्मेशन’ आणि चार मिग-२१ विमानांतून ‘पॅन्थर फॉर्मेशन’ केले. ‘सूर्य किरण’ एअरोबॅटिक पथकाने हवाई कसरती करून उपस्थितांचे मन जिंकले. – मिग-२१ विमानांना जलतोफांनी सलामी देण्यात आली. समारंभात जॅग्वार आणि तेजस विमानांनीही सहभाग घेतला होता.