मध्य दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटाची तीव्रता फारच कमी होती. बॉम्बस्फोट झालेल्या परिसराला सुरक्षा पथकांनी घेराव घातला असून यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या स्फोटाचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाला पाचारण करण्यात आले असून त्यांना घटनास्थळी एक बंद पाकिट सापडल्याचे वृत्त एएनआयने दिलं आहे. या पाकिटासंदर्भात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने काही महत्त्वाची माहिती सांगितली असून यासंदर्भात अधिक तपास सुरू आहे.
तपास करण्यासाठी आलेल्या पथकाला घटनास्थळी एक बंद पाकिट (एनव्हलोप) सापडलं. त्या पाकिटावर इस्त्रायल दूतावासातील एका अधिकाऱ्यासंबंधी मजकूर लिहिलेला आढळला. “बंद पाकिटावर इस्त्रायली दूतावासात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्यासंबंधी मजकूर लिहिलेला आहे. या बंद पाकिटाचा आणि त्यावरील मजकूराचा बॉम्बस्फोटाशी काही संबंध आहे की नाही याचा तपास दाखल झालेले पथक करत आहे. पण ते बंद पाकिट घटनास्थळावरून हस्तगत करण्यात आलं आहे एवढं नक्की”, अशी माहिती वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना दिली.
Investigators have recovered an envelope from the spot, text written on it is related to Israel Embassy officials. Investigators are looking into whether it is linked to the incident or not: Sources
— ANI (@ANI) January 29, 2021
विजय चौकपासून दोन किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर असलेल्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य वरिष्ठ सदस्य उपस्थित असलेल्या विजय चौकवर सैन्याचा ‘बिटिंग रिट्रिट’ सोहळा सुरू असतानाच हा बॉम्बस्फोट घडला. या घटनेची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. तसेच, गृहमंत्री अमित शाह हेदेखील या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.
“दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटाबाबत इस्त्रायलचे परराष्ट्र मंत्री गाबी अश्केनाझी यांच्याशी मी संवाद साधला आहे. या स्फोटाची सरकारने गंभीर दखल घेतली असून इस्त्रायली दूतावासातील कर्मचारी आणि शिष्टमंडळतील सदस्य यांना संपूर्ण सुरक्षा पुरवली गेली आहे. घडलेल्या प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींबाबत कोणतीही हयगय केली जाणार नाही”, असे प्रतिपादन एस जयशंकर यांनी केले आहे.
बॉम्बस्फोटाबाबत अधिक माहिती म्हणजे, IEDच्या स्वरुपातील ही स्फोटके प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून पदपथावर ठेवलेली होती. स्फोटामुळे त्या भागात पार्क केलेल्या चार ते पाच गाडयांच्या काचा फुटल्या. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी दाखल झालं. अग्नीशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या.