Delhi BMW Accident News : दिल्लीमधील कॅन्टॉन्मेंट भागात रविवारी (१४ सप्टेंबर) दुपारी भरधाव बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी कार चालवणाऱ्या महिलेला अटक केली आहे. या महिलेविरोधात मनुष्यवधासंबंधी (हत्या न ठरणारा) कलमांतर्गत आणि अपघातानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असणारे नवजोत सिंग (५७) आणि त्यांच्या पत्नी रविवारी दुपारी दिल्लीतील कॅन्टॉन्मेंट परिसरात दुचाकीवरून प्रवास करत होते. त्याचवेळी एका बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नवजोत सिंग यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गगनप्रीत नावाची महिला ही बीएमडब्ल्यू कार चालत होती. कारमध्ये तिच्याबरोबर तिचा पतीन परीक्षित मक्कर आणि तिची दोन मुलं प्रवास करत होती. ही कार परिक्षित यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. हे दाम्पत्य दिल्लीमधील रजौरी गार्डन परिसरात वास्तव्यास आहे. दी इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जखमींना अपघाताच्या ठिकाणापासून १७ किलोमीटर दूर का नेलं?

या अपघात प्रकरणाची माहिती देताना एका पोलिसा अधिकाऱ्याने सांगितलं की “अपघातानंतर गगनप्रीत व परिक्षित या दोघांनी जखमी नवजोत आणि त्यांच्या पत्नीला गुरु तेग बहादूर नगर येथील न्यूलाईफ रुग्णालयात नेलं. हे रुग्णालय अपघाताच्या ठिकाणापासून १७ किलोमीटर दूर आहे. रुग्णालयाचा मालक गगनप्रीत यांच्या ओळखीचा आहे. कारण याच भागात त्यांचं माहेर आहे. याच रुग्णालयात गगनप्रीत आणि तिचे पती परिक्षित यांना देखील दाखल करण्यात आलं आहे. हे सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.”

विविध कलमांखाली गगनप्रीतविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितलं की “गगनप्रीत व तिच्या पतीचे जबाब अद्याप नोंदवले नाहीत. मात्र, दिल्ली कन्टॉन्टमेंट पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम २८१ (बेजबाबदारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवणे, कलम १२५ ब (इतरांच्या जीवितास किंवा वैयक्तिक सुरक्षिततेस धोका पोहोचवणाऱ्या कृती). कलम १०५ (खुनाच्या हेतूविना घातपात करणे) आणि कलम २३८ (गुन्ह्याचे पुरावे लपवणे, नष्ट करणे, गुन्हेगाराला वाचवण्यासाठी खोटr माहिती देणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.