Delhi MPs Flat Fire: दिल्लीमधील बीडी मार्गावरील ब्रह्मपुत्रा या अपार्टमेंटमध्ये शनिवारी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपार्टमेंटमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार राहतात. या आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

दरम्यान, खासदारांची ही अपार्टमेंट संसदेपासून २०० मीटर अंतरावर आहे. या आगीत अपार्टमेंटमधील काही फ्लॅटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आगीची घटना घडल्यानंतर काही वेळातच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ६ गाड्या दाखल झाल्या आणि अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यांपैकी एका मजल्यावर आग लागली, त्यामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांमध्ये एकच घबराट पसरली आणि मोठा गोंधळ उडाला. मात्र, त्यानंतर तत्काळ ही घटना अग्निशमन दलाला कळवण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणली.

समोर आलेल्या वृत्तानुसार, संसदेपासून फक्त २०० मीटर अंतरावर ही ब्रह्मपुत्रा अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये संसदेच्या सदस्यांना फ्लॅट देण्यात आलेले आहेत. संसदेच्या सदस्यांना देण्यात आलेल्या अधिकृत निवासस्थानांपैकी हे एक निवासस्थान आहे.

खासदार साकेत गोखले यांनी काय म्हटलं?

तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये साकेत गोखले यांनी म्हटलं की, “दिल्लीतील बीडी मार्गावरील ब्रह्मपुत्रा अपार्टमेंटमध्ये मोठी आग लागली आहे. सर्व रहिवासी राज्यसभेचे खासदार आहेत. ही इमारत संसदेपासून २०० मीटर अंतरावर आहे. ३० मिनिटांपासून आग लागली. आग अजूनही जळत आहे आणि वाढत आहे. वारंवार फोन करूनही अग्निशमन दलाच्या गाड्या गायब आहेत. दिल्ली सरकारला थोडी लाज वाटावी”, अशी टीका करत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उशीरा दाखल झाल्याचा आरोप साकेत गोखले यांनी केला आहे.