नवी दिल्ली, मुंबई : न्यू यॉर्क-दिल्ली विमानामध्ये महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव शंकर मिश्रा असे आहे. तो कामाला असलेल्या कंपनीने त्याची तातडीने हकालपट्टी केली आहे. शंकर हा मुंबईचा. दिल्ली पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी शहरात दाखल झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शंकर मिश्रा हा ‘वेल्स फर्गो’ या अमेरिकेच्या कॅलिफोनिर्जंयात मुख्यालय असलेल्या कंपनीचा भारतातील उपाध्यक्ष होता. ही घटना उजेडात येऊन त्याची ओळख पटल्यानंतर वेल्स फर्गोने पत्रक जारी करून मिश्राला काढून टाकल्याचे जाहीर केले आहे. ‘आपल्या कर्मचाऱ्यांनी व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर चांगली वागणूक ठेवावी, हे कंपनीचे धोरण आहे. मिश्रा याच्यावर झालेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे असून त्याची तातडीने हकालपट्टी करण्यात येत आहे. आम्ही पोलीस आणि अन्य तपास यंत्रणांना याप्रकरणी सर्व प्रकारचे सहकार्य करत आहोत,’ असे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.  दरम्यान, शंकर मिश्रा हा मुंबईचा राहणारा असल्याचे स्पष्ट झाले असून तो सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांचे पथक मुंबईमध्ये दाखल झाले आहे. दिल्ली पोलिसांनी पीडित वृद्ध महिलेने एअर इंडियाला दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील चार पोलिसांचे पथक नेहरू नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. मुंबई पोलिसांकडून कोणतेही मनुष्यबळ न घेता त्यांनी कुर्ला येथील कामगार नगरातील बी-४७ या बंगल्याचा तपास केला. मात्र बंगल्याला कुलूप असल्याचे स्पष्ट झाले. मिश्राच्या शोधासाठी दिल्ली पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुंबई पोलिसांनी दिली.

दुसरी घटना उजेडात

गेल्या वर्षी ६ डिसेंबरला पॅरीस-नवी दिल्ली विमानातही अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले आहे. मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने एका महिलेच्या ब्लँकेटवर लघुशंका केल्याचे उघड झाले असून डीजीसीएने याबाबतही एअर इंडियाकडे स्पष्टीकरण मागितले आहे. अवघ्या १० दिवसांत अशा दोन घटना घडल्यानंतर आता डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना नोटीस पाठविली असून अशा प्रकारच्या तक्रारींच्या हाताळणीमध्ये हयगय खपवून घेतली जाणार नाही, असे बजावले आहे.

महिला आयोगाकडून दखल

’ज्येष्ठ नागरिक महिलेबरोबर घडलेल्या या घृणास्पद कृत्याची दिल्लीच्या महिला आयोगाने दखल घेतली आहे.

’आयोगाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली असून दाखल करण्यात आलेला एफआयआर तसेच पुढील तपासाची माहिती मागविली आहे.

’विमान कंपनीकडून झालेल्या हलगर्जीबाबत काय कारवाई केली, याचा अहवालही १० जानेवारीपूर्वी सादर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi police team visits residence of shankar mishra in kurla zws