Delhi Red Fort Blast Latest Updates : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाला सहा दिवस उलटले आहेत. शनिवारी दुपारी (१५ नोव्हेंबर) दिल्ली पोलिसांनी घटनास्थळ स्वच्छ करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. त्यानंतर लोक हळूहळू चांदणी चौक व लाल किल्ल्याकडे परतू लागले आहे. स्फोटानंतर केवळ या घटनास्थळाचे फोटो काढण्यासाठी अनेकजण लाल किल्ला परिसरात येत आहेत. तसेच लोक येथे खरेदीसाठी परत येऊ लागले आहेत. हा परिसर पुन्हा गजबजू लागला असला तरी वातावरणात थोडीफार अस्वस्थथा जाणवतेय, लोक अजूनही त्या स्फोटाबद्दल चर्चा करत आहेत.

दी इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, स्फोटाच्या ठिकाणी, चांदणी चौक बाजाराच्या प्रवेशद्वाराजवळ तीन पोलीस कर्मचारी फाइल्सचा मोठा गठ्ठा घेऊन काम करत असल्याचं पाहायला मिळालं. तर अनेकजण त्यांच्याकडे जाऊन आपली वाहनं परत मिळावी यासाठीची कार्यवाही पूर्ण करत होते. स्फोट झाल्यानंतर अनेकांना आपली वाहनं तिथेच सोडून जावं लागलं होतं. तसेच पोलिसांनी स्फोटाच्या आसपासचा परिसर आपल्या नियंत्रणात घेऊन कोणालाही तिथे फिरकू दिलं नव्हतं. त्यामुळे तिथे उभी असलेली आपली वाहनं परत घेण्यासाठी कार्यवाही चालू होती.

अजूनही सगळीकडे स्फोटाची चर्चा

उत्तर भारतात लग्नसराईचा हंगाम चालू आहे. या काळात चांदणी चौक परिसरात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळतं. मात्र शनिवारच्या दिवशीसुद्धा हा परिसर रिकामा वाटत होता. तसेच जे लोक खरेदीसाठी तिथे आले होते त्यांच्यात केवळ गेल्या आठवड्यात झालेल्या स्फोटाचीच चर्चा चालू होती.

ठवडाभराने मेट्रो स्थानक खुलं

लाल किल्ल्याबाहेरची पोलीस चौकी स्फोटाच्या धक्क्याने उद्ध्वस्त झाली आहे. चौकीचं संपूर्ण छप्पर कोसळलं आहे. तर, लाल किल्ला मेट्रो स्थानकात, कामगार फुटलेल्या काचा काढत होते आणि आतमध्ये तैनात जवान प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्याकडे बारकाईने पाहत होते. दुपारी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक्सवरून जाहीर केलं की प्रवेशद्वार क्रमांक २ आणि ३ आता प्रवाशांसाठी खुले आहेत.

अजय कुमार यांनी सांगितली आपबिती

लग्नसराईचा हंगाम असूनही बाजार रिकामा वाटत होता. दरम्यान, चांदणी चौकात इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान चालवणारे अजय कुमार हे आठवड्याभरानंतर दुकानात परतले. ते म्हणाले, “त्या दिवशी इतकी गर्दी होती की माझ्या मुलाने स्कूटर इथेच ठेवली होती. आम्ही स्फोटाचा आवाज ऐकला आणि त्याच वेळी आगीचा एक गोळा वर जाताना पाहिला. आमचं नशीब चांगलं म्हणून आम्ही वाचलो. माझ्या स्कूटरलाही काही झालं नाही. स्कूटरच्या बाजूला एक एसयूव्ही होती. त्या एसयूव्हीचं बरंच नुकसान झालं. स्कूटर एसयूव्हीच्या आडोशाला होती त्यामुळे तिचं काही नुकसान झालं नाही.”

अजय कुमारही आपली स्कूटर परत मिळावी यासाठी पोलिसांसमोरच्या रांगेत उभे होते. यावेळी त्यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी बातचीत केली.

“आम्हाला अजूनही भीती वाटतेय”

चांदणी चौकात उभा राहून बेल्ट (कमरेचा पट्टा) विकणारा इंद्रजीत कुमार मुखिया म्हणाला, “त्या दिवशी मी जे चित्र पाहिलं तसं चित्र यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. इथे आमच्या आसपास रोज दिसणारे चेहरे आता आपल्यात नाहीत. काहीजण भीतीने परतले नाहीत. अजूनही आम्हाला भीती वाटतेय. परंतु, पोट भरण्यासाठी यावं लागलं. म्हणूनच मी आलो.”