High Court : न्यायालयात दररोज अनेक महत्वाच्या कायदेशीर प्रकरणांवर सुनावणी होत असते. त्यामध्ये विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर किंवा मालमत्तांच्या वादांवर किंवा आणखी अन्य कोणत्याही प्रकरणाच्या संदर्भात न्यायालयात सुनावणी पार पडते आणि त्यानंतर न्यायालय निर्णय देत असतं. न्यायालय निर्णय देत असताना अनेकदा महत्वाची निरीक्षण नोंदवत असतं. आता केरळ उच्च न्यायालयाने देखील एका प्रकरणाचा निर्णय देताना एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे.

‘एखाद्या व्यक्तीला केवळ हिपॅटायटीस बी पॉझिटिव्ह आहे म्हणून सार्वजनिक नोकरीची संधी नाकारणं हे भारतीय संविधानाच्या कलम १४ अंतर्गत हमी दिलेल्या समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन आहे’, असं निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अमित रावल आणि केव्ही जयकुमार यांच्या खंडपीठाने नोंदवलं आहे. या संदर्भातील वृत्त ‘बार अॅड बेंच’ने दिलं आहे.

केरळ उच्च न्यायालयाने म्हटलं की, “तसेच केवळ हिपॅटायटीस बी पॉझिटिव्ह आहे या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक नोकरी नाकारणं हे बेकायदेशीर आणि अन्याय कारक आहे. या बरोबरच भारतीय संविधानाच्या कलम १४ अंतर्गत हमी दिलेल्या समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन देखील आहे.” तसेच या प्रकरणात न्यायालयाने असंही म्हटलं की, “वैद्यकीय तंदुरुस्तीशी संबंधित नियमांचा उद्देश केवळ कामाच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला किंवा मालमत्तेला धोका न पोहोचवता व्यक्ती आपलं काम करण्यास सक्षम आहे याची खात्री करणं आवश्यक आहे.”

दरम्यान, एका व्यक्तीने केरळ उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकाकर्त्याने एका संस्थेच्या सहायक जनरल पदासाठीच्या भरती प्रक्रियामध्ये दुसरे स्थान प्राप्त केलं होतं. मात्र, नियुक्तीपूर्वीच्या वैद्यकीय तपासणीत हिपॅटायटीस बी संसर्गामुळे तो अयोग्य असल्याचं सांगत त्याची नियुक्ती नाकारण्यात आली होती. त्यानंतर या व्यक्तीने त्याची नोकरी नाकारल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, यानंतर केरळ उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी पार पडली असता उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या बाजूने निर्णय देत महत्वाची टिप्पणी केली.

हिपॅटायटीस बी काय आहे?

हिपॅटायटीस बी किंवा सी हा यकृताशी संबंधित संसर्गजन्य आजार आहे. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे विषाणूंमुळे पसरतो. या आजाराची लक्षणे लवकर जाणवत नाहीत. त्यामुळे या आजाराचा संसर्ग झाला आहे की नाही? हे तपासणी केल्याशिवाय स्पष्ट होत नाही. अनेकवेळा अपघाताने या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं उघडकीस येतं. तसेच या आजाराच्या टेस्ट कराव्या लागतात. त्यानंतर नेमकं हा आजार झाला आहे की नाही? हे समजतं.