‘ब्रिटिश खासदार थॉमस बॅबिंगटन मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीने भारतीयांमध्ये ब्रिटिश वसाहतवादी गुलामीची मानसिकता खोलवर रुजवली. हीच मानसिकता स्वातंत्र्यानंतरही आजतागायत कायम राहिली आहे. मेकॉलेच्या या गुलामगिरी मानसिकतेला पुढील दहा वर्षांत समूळ नष्ट करा,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.

एक्स्प्रेस समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मरणार्थ आयोजित केल्या जाणाऱ्या स्मृती व्याखानाच्या सहाव्या पर्वात पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. भारताची विकासगाथा, बिहारच्या निवडणुकीच्या निकालाचे गमक, काँग्रेसने आणलेला कथित मुस्लीमलिगी माओवादी विचार, शहरी नक्षलवाद विचारांमुळे सुरू असलेली देशविरोधी आंदोलने आदीवर पंतप्रधानांनी भाष्य केले. मात्र, भारतीय शिक्षणव्यवस्थेत रुजलेल्या आणि पुढे समाजाच्या मानसिकतेचा भाग बनलेल्या ब्रिटिश विचारप्रणालीवर त्यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘मेकॉलेने भारतीयांची मने ब्रिटिश केली. त्याने प्राचीन भारतीय शिक्षण व्यवस्था पूर्णपणे नष्ट केली. ब्रिटिश भाषा आणि विचार भारतात रूढ केले. त्याचा परिणाम असा झाला की हजारो वर्षांचे भारतीय ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, परंपरा, जीवनशैलीही नष्ट होत गेली. भारतीय लोक ब्रिटिश सांगतील तसे जगायला लागले. त्यामुळे आपले काय याचाच आपल्याला विसर पडला. आपल्या संस्कृती, परंपरा, शिक्षण यांचा गौरव करण्याचे सोडून आपण त्याकडे तुच्छतेने पाहू लागलो. आयात विचार, आयात वस्तू, आयात सुविधा आणि आयात प्रारूपांवर जगू लागलो. दुसऱ्याच्या संकल्पना आपल्याला श्रेष्ठ वाटू लागल्या. स्वदेशीला नाकारण्याची ही वृत्ती स्वातंत्र्यानंतरही कायम राहिली. ही गुलामगिरीची प्रक्रिया मेकॉलेने १८३५ मध्ये सुरू केली होती. त्याला २०३५मध्ये २०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पुढील दहा वर्षांत आपल्याला या मानसिकतेपासून मुक्ती मिळवायची आहे.’

मानसिक गुलामगिरीचाच धागा पुढे नेत मोदी म्हणाले की, मेकॉलेच्या गुलामगिरीच्या प्रवृत्तीने पर्यटनासारख्या क्षेत्राचेही मोठे नुकसान केले आहे. आपणच आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान बाळगला नाही तर दुसरे कसे बाळगतील. इतर देशांमध्ये तिथले लोक स्वतःची परंपरा, संस्कृती जपतात, भारतात मात्र उलटेच घडलेले आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राचा विकासच होऊ शकला नाही! ही गुलामगिरीची मानसिकता झुगारून देण्याचा भाग म्हणूनच आमच्या सरकारने स्थानिक भाषांना महत्त्व दिले. आम्ही इंग्रजी विरोधात नाही पण, भारतातील प्रादेशिक भाषांना प्राधान्य दिले तरच आपली संस्कृती टिकेल. म्हणूनच आम्ही नवे शिक्षण धोरण आणले. त्यामध्ये स्थानिक भाषांना महत्त्व दिले आहे. स्थानिक भाषांमध्ये मुलांना शिक्षण घेता येईल.

‘इंडियन एक्स्प्रेस’चे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या कार्याचे मोदींनी कौतुक केले. रामनाथ गोएंका यांनी नेहमीच देशहिताला प्राधान्य दिले. लोकशाही टिकवण्यासाठी त्यांनी कोणाचीही पर्वा केली नाही. अग्रलेखाची जागा कोरी ठेवून आणीबाणीच्या विरोधात निडरपणे लढा दिला. त्यातून लोक गुलामगिरीच्या मानसिकतेला आव्हान देऊ शकतात हे रामनाथ गोएंका यांनी दाखवून दिले, असे मोदी म्हणाले. रामनाथ गोएंका यांनी स्वातंत्र्यलढ्यात काँग्रेसला पाठिंबा दिला. पुढे जनता पक्ष आणि नंतर जनसंघाकडून त्यांनी निवडणूकही लढवली.राजकीय पक्षांचे वैचारिक धोरण काहीही असले तरी रामनाथ गोएंका यांच्यासाठी देशहितच महत्त्वाचे होते. इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात नानाजी देशमुख यांच्या मदतीने जयप्रकाश नारायण यांना नवनिर्माण आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार केले, अशा शब्दांत मोदींनी रामनाथ गोएंका यांच्या देशबांधणीतील योगदानाचे कौतुक केले.

भारत उदयन्मुख विकासाचे प्रारूप

भारत विकसित होण्याकडे वेगाने धावू लागला आहे, असे सांगताना, भारत हा फक्त उदयन्मुख आर्थिक व्यवस्था नव्हे तर उदयन्मुख विकासाचे प्रारूप आहे. भारताच्या आर्थिक विकासाच्या प्रारूपाचे जगभर कौतुक होत आहे. या प्रारूपामध्ये सामाजिक सुरक्षेला सर्वाधिक महत्त्व आहे. आम्ही ९४ कोटी लोकांना सामाजिक सुरक्षा दिली आहे. दलितांपासून शोषितांपर्यंत सर्वांना सामाजिक सुरक्षा पुरवली जात आहे, त्यामध्ये भेदभाव केला जात नाही. विकास गरिबांपर्यंत पोहोचवला जातो, हे परिपक्व लोकशाहीचे द्योतक आहे, असे विचार मोदींनी मांडले.

विकास, विकास, विकासगेल्या ११ वर्षांत एनडीए सरकारने अत्यंत मागास जिल्ह्यांचा विकास केला. अशा विकासाच्या प्रारूपामुळेच लोकांना आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण होतील, अशी आशा निर्माण झाली. बिहारचा निकाल काय लागला हे लोकांनी पाहिलेच आहे. राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाचे सरकार असो, त्यांना सत्ता हवी असेल व ती टिकवायची असेल तर विकास-विकास आणि विकासालाच प्राधान्य दिले पाहिजे, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.‘मुस्लीमलिगी माओवादी काँग्रेस’

मोदींनी काँग्रेसच्या राजकीय प्रवृत्तीवर तीव्र टीका केली. काँग्रेसने शहरी भागांमध्येही नक्षलवाद वाढवला. नक्षलवाद संविधानविरोधी असतानाही काँग्रेसने नक्षलवाद्यांना पोसले. गेल्या १०-१५ वर्षांमध्ये शहरी भागांतील संस्थामध्ये शहरी नक्षल निर्माण केले. काँग्रेसच्या मुस्लीमलिगी माओवादाला तिलांजली दिली पाहिजे. काँग्रेसच्या या शहरी नक्षलवादामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण झाला आहे, असेही मोदी म्हणाले.