मायकल जॅक्सन हा जगातला सर्वात लोकप्रिय पॉपस्टार होता. या पॉपस्टारने जितकी प्रसिद्धी पाहिली जितकं यश पाहिलं तितकं यश अद्याप कुठल्या पॉपस्टारच्या नशिबी आलेलं नाही. मात्र याच मायकल जॅक्सनवर लैंगिक शोषणाचे आरोपही झाले. त्याविषयीच्या फाईल बंद झाल्या होत्या. मात्र या आरोपांच्या फाईल पुन्हा उघडण्यास कॅलिफोर्निया कोर्टाने संमती दिली आहे. वेड रॉबसन आणि जेम्स सेफचूक यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. त्यानंतर या फाईल्स पुन्हा उघडण्यास न्यायालयाने संमती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं गेलं आहे याचिकेत?

कॅलिफोर्नियातील न्यायालयाच्या न्यायाधीश एलिझाबेथ ग्रिम्स, जॉन विली आणि व्हिक्टर व्हिरामोंटस या तिघांनीही मायकल जॅक्सनच्या मालकीच्या एमजेजे प्रॉडक्शन्स आणि एमजेजे व्हेंचर्स यांच्या विरोधात निकाल देत लैंगिक शोषणांच्या आरोपांचा खटला पुन्हा चालवण्यास संमती दिली आहे. या प्रकरणातले फिर्यादी वेड आणि जेम्स यांनी मायकल जॅक्सनवर ७ आणि १० वर्षांच्या वयोगटाच्या मुलांचं लैंगिक शोषण केल्याचं याचिकेत म्हटलं आहे. एवढंच नाही तर वेडने हेदेखील म्हटलं आहे त्याचं शोषण सात वर्षे करण्यात आलं. तर जेम्सने असं म्हटलं आहे की मायकल जॅक्सनने चार वर्षे माझ्यावर अत्याचार केले. तसंच MJJ प्रॉडक्शन ही मायकलची कंपनी आहे. या कंपनीने लैंगिक शोषणाची ही प्रकरणं लपवण्यात त्याला मदत केली. मायकलच्या कर्मचाऱ्यांनी काही अशी धोरणं तयार केली ज्यानुसार मायकल मुलांसह एकटा राहू शकत होता.हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

मायकल जॅक्सनच्या आयुष्यातला काळा अध्याय

लैंगिक शोषणाचे आरोप हा मायकल जॅक्सनच्या आयुष्यातला काळा अध्याय आहे असंही म्हणता येईल. २३ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, १३ ग्रॅमी अवॉर्ड्स, २६ अमेरिकन म्युझिक अवॉर्ड हे मायकलच्या नावे आहेत. मात्र १९९३ हे वर्ष उजाडलं आणि मायकल जॅक्सनच्या आयुष्यातला काळा अध्याय जन्माला आला. १९९३ च्या ऑगस्ट महिन्यात मायकल जॅक्सनवर १३ वर्षांच्या एका मुलाचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप लागला. या आरोपामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली. मायकल जॅक्सनवर हा आरोप होणं ही जगातल्या प्रसारमाध्यमांसाठी मोठी बातमी ठरली. लॉस एंजल्स पोलिसांनी या प्रकरणात चौकशी सुरु केली. मायकलच्या घरातून काही व्हिडीओ टेप्स पोलिसांनी जप्त केल्या. सप्टेंबर १९९३ या महिन्यात मायकल मॉस्कोच्या टूरवर होता तेव्हा या मुलाच्या आई वडिलांनी मायकलच्या विरोधात खटला दाखल केला.

हे पण वाचा- पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या भारतभेटीचे दुर्मिळ फोटो

हे पण वाचा- ‘ती’ माझी मोठी चूक होती; मायकल जॅक्सन लूकमध्ये बिग बींनी शेअर केला फोटो

यानंतर विविध तक्रारी येत होत्या. अखेर लैंगिक शोषण प्रकरणी फेब्रुवारी २००५ पासून सुनावणीला सुरुवात झाली. मायकल जॅक्सनवर पीडित मुलांनी हे आरोप केले की मायकलने त्यांचं लैंगिक शोषण केलं आहे. मात्र मायकल जॅक्सनने या प्रकरणात कानावर हात ठेवत सगळे आरोप फेटाळले. मायकलवर जे आरोप लावले गेले ते सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यानंतर २५ जून २००९ या दिवशी मायकल जॅक्सनचा मृत्यू झाला.

मायकलवरची डॉक्युमेंट्रीही चर्चेत

मायकल जॅक्सनवरची एक डॉक्युमेंट्री HBO ने तयार केली होती. या डॉक्युमेंट्रीवरुनही बराच वाद झाला होता कारण यामध्ये मायकल जॅक्सन त्याच्या फार्म हाऊसवर लहान मुलांचं लैंगिक शोषण करत होता असं दाखवलं गेलं. यानंतर जॅक्सन कुटुंबातर्फे या वाहिनीच्या विरोधात खटलाही दाखल करण्यात आला होता. तसंच मायकल जॅक्सनच्या मुलीनेही हे सांगितलं होतं की ही डॉक्युमेंट्री माझ्या वडिलांची बदनामी करण्यासाठी तयार केली गेली आहे. या सगळ्या प्रकरणाला इतकी वर्षे उलटल्यानंतर आता पुन्हा एकदा लैंगिक शोषणाच्या आरोप प्रकरणात खटला सुरु करण्यास कॅलिफोर्नियाच्या न्यायालयाने संमती दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Did michael jackson sexually molest children lawsuit filed against singer reopens scj