काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी टि्वटस करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अयोध्येतील राम मंदिर निर्माण भूमिपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

“अशुभ मुहुर्तावर राम मंदिराचे भूमिपूजन करुन मोदीजी तुम्ही अजून किती लोकांना रुग्णालयात पाठवणार आहात? योगीजी आत तुम्हीच मोदींना समजावा, तुम्ही असताना सनातन धर्माच्या सर्व मर्यादा का तोडल्या जात आहेत? आणि तुमची अशी काय अडचण आहे, कि, तुम्ही हे सर्व होऊ देताय?” असे दिग्विजय सिंह यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. भूमिपूजनासाठी निवडलेल्या अशुभ मुहुर्तामुळेच या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्यांना करोना व्हायरसची लागण होतेय याकडे दिग्विजय सिंह यांच्या टि्वटसचा रोख आहे.

आणखी वाचा- उमा भारती पाच ऑगस्टला अयोध्येत असणार पण…

भारताचे गृहमंत्री अमित शाह, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्षांना करोना व्हायरसची बाधा झाल्याचे दाखले त्यांनी टि्वटसमध्ये दिले आहेत.

आणखी वाचा- “राम मंदिरासाठी मोदींनी नाही तर राजीव गांधींनी दिलंय योगदान”; भाजपा खासदाराचा घरचा आहेर

आणखी वाचा- अयोध्या रेल्वे स्टेशनचाही चेहरामोहरा बदलणार; मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणं होणार पुनर्बांधणी

माझी मोदीजींना विनंती आहे, त्यांनी पाच ऑगस्टचा अशुभ मुहुर्त टाळावा, शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर राम मंदिर निर्माणाचा योग आला आहे असे दिग्विजय यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. भगवान राम कोट्यवधी हिंदुंच्या आस्थेचे केंद्र आहे. हजारो वर्षांपासून धर्माच्या स्थापित मान्यतांबरोबर खेळू नका असा दिग्विजय सिंह यांनी सल्ला दिला आहे.