Donald Trump claim India cutting back completely on Russian oil Purchase : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत रशियाकडून होणारी तेलाची खरेदी कमी करणार असल्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या आशिया दौऱ्यात आसियान (ASEAN) शिखर परिषदेत सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले आहे. रविवारी एअर फोर्स वन विमानात प्रवास करतेवेळी त्यांनी एका माध्यम प्रतिनिधीशी बोलताना पुन्हा एकदा दावा केला की भारत रशियन तेलाची खरेदी कमी करेल.
वाढवलेले टॅरिफ आणि भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिक यांच्यातील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. रशियाकडून तेल खरेदी केल्याने ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के शुल्क लादले आहे. तसेच त्यांनी भारतावर युक्रेनमधील युद्धाला पाठबळ दिल्याचा आरोपही केला आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी रशियन तेलाच्या खरेदीबद्दल चर्चा करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “मी कदाचित त्यावर चर्चा करेन. तुम्ही कदाचित आज पाहिले असेल, चीन रशियन तेल खरेदीत मोठी कपात करत आहे आणि भारत हा पूर्णपणे बंद करत आहे आणि आम्ही निर्बंध लादले आहेत.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला बड्या रशियन तेल कंपन्या Rosneft आणि Lukoil यांच्यावर नवीन निर्बंध जाहीर केले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांचे रशियन तेलाची खरेदी थांबवण्यासंबंधीचे हे वक्तव्य खूप महत्त्वाच्या वेळी करण्यात आले आहे. कारण ट्रम्प हे दक्षिण कोरियामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी नियोजित भेट घेणार आहेत.
अमेरिकेने चीनवरील टॅरिफ वाढवल्यानंतर ट्रम्प आणि शी जिनपिंग यांची ही भेट होत आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी तणाव कमी करण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे.
ट्रम्प यांचा यापूर्वीही असाच दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीलाही असेच एक वक्तव्य केले होते, ज्यात त्यांनी दावा केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना आश्वासन दिले आहे की भारत रशियाकडून होणारी तेलाची खरेदी कमी करेल आणि काही काळाने पूर्णपणे थांबवेल.
पण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला होता. मंत्रालयाने स्पष्ट केले की, अस्थिर ऊर्जा बाजारात भारत सर्वप्रथम आपल्या राष्ट्रीय हिताला आणि भारतीय ग्राहकांना प्राधान्य देईल.
