Doandl Trump Shahbaz Sharif: भारत व पाकिस्तान यांच्यातील वाद आता मिटले असून ते दोन्ही देश एकमेकांसोबत शांततेत राहतील, असं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. ट्रम्प असं म्हणत असताना त्यांच्या मागेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ उभे होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हणून मागे वळून बघताच शरीफ यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हावभाव सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावरून शाहबाज शरीफ यांना ट्रोल केलं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

गाझा पट्ट्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी इस्रायल व हमास यांच्यात २० कलमी शांतता प्रस्तावावर सहमती घडवून आणल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. यानिमित्ताने ट्रम्प यांनी जगभरातल्या अनेक महत्त्वाच्या राष्ट्रप्रमुखांना गाझा समिटसाठी आमंत्रित केलं होतं. या समिटनंतर माध्यमांशी संवाद साधताना डोनाल्ड ट्रम्प यांनी वरील विधान केलं आहे. यावेळी ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनाही माध्यमांशी संवाद साधण्यासाठी पाचारण केलं होतं.

“भारत हा एक महान देश आहे. माझे एक चांगले मित्र तिथे नेतृत्व करत आहेत. भारतानं खरंच खूप चांगली कामगिरी केली आहे. आता मला वाटतं की पाकिस्तान आणि भारत सोबत छान राहतील”, असं म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मागे उभ्या असलेल्या शाहबाज शरीफ यांच्याकडे पाहून “हो ना?” असं विचारलं. यावेळी शाहबाज शरीफ अर्थपूर्ण पद्धतीने हसू लागले. शिवाय हात वर करून ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्याचाही प्रयत्न करताना दिसत होते. पण त्यांची प्रतिक्रिया न ऐकताच डोनाल्ड ट्रम्प समोरच्या दिशेला वळले व त्यांनी आपलं भाषण चालू ठेवलं. “या दोन्ही देशांमध्ये दोन खूप उत्तम नेते आहेत”, असं ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांचा आग्रह, शरीफ यांची स्तुतिसुमनं!

दरम्यान, आपलं भाषण चालू असतानाच ट्रम्प यांनी मध्येच थांबून शाहबाज शरीफ यांना “तुम्हाला काही बोलायचं आहे का? तुम्ही मला त्या दिवशी जे म्हणालात ते सांगा”, अशी विनंती केली. त्यानंतर शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मनसोक्त स्तुतिसुमनं उधळली.

“मी म्हणेन की आजचा दिवस हा सध्याच्या काळातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांनंतर शांतता प्रस्थापित झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे खरोखर शांततेचे दूत आहेत. या जगाला शांतता व समृद्धीच्या वातावरणात राहण्यायोग्य बनवणम्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांत अथक व अविरतपणे काम केलं आहे”, असं शरीफ म्हणाले.

पुन्हा नोबेल पुरस्कारासाठी शिफारस

इतक्या कौतुकानंतर शाहबाज शरीफ यांनी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली. “जर हे जंटलमन (डोनाल्ड ट्रम्प) नसते, त्यांनी भारत व पाकिस्तानच्या संघर्षात मध्यस्थी केली नसती, तर युद्ध पुढच्या पातळीवर गेलं असतं. या दोन्ही देशांकडे आण्विक शक्ती आहे. संघर्ष वाढला असता तर काय घडलं असतं हे सांगण्यासाठी कोण जिवंत राहिलं असतं?” असंही शरीफ यावेळी म्हणाले.