Donald Trump : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची सध्याची भूमिका आणि अमेरिकेची ताकद काय ते सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असतानाच त्यांचा टेलीप्रॉम्प्टर बंद पडला. पण डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की यामुळे काहीही अडत नाही. मी आत्तापर्यंत भारत-पाकिस्तानसह सात युद्ध थांबवली आहेत याचा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

“मला टेलीप्रॉम्प्टरशिवाय भाषण करण्यात काहीही अडचण नाही. टेलीप्रॉम्प्टर काम करत नाहीये जो कुणी तो नियंत्रित करतो आहे त्याला त्रास होईल.” असं डोनाल्ड ट्रम्प गंमतीत म्हणाले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेचं बळ कसं आहे यावर भर दिला. अमेरिकेकडे सध्या सामर्थ्यशाली अर्थव्यवस्था, सर्वात बळकट असलेल्या सीमा, सर्वात ताकदवाद सैन्य आणि बलशाली मित्र आहेत. तसंच देशवासीयांमध्ये राष्ट्रभावनाही तडफेने भरेली आहे. सध्याचा काळ अमेरिकेसाठीचा सुवर्ण काळ आहे. एवढंच नाही तर मी पुन्हा सांगतो भारत आणि पाकिस्तान युद्धासह मी सात युद्धं थांबवली आहेत.

अमेरिकेची ताकद जगाला माहीत आहे-ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले अमेरिकेची ताकद काय आहे हे आपल्याला माहीत आहेच. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानसह सात युद्धांमध्ये समझोता घडवून ती थांबवली याचा पुनरुच्चार केल्याने आता पुन्हा एकदा विरोधक या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जेव्हा आधी हा मुद्दा उपस्थित केला होता तेव्हा त्याचे पडसाद लोकसभेतही उमटले होते. राहुल गांधी यांनी सातत्याने याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तसंच पंतप्रधान यांनी उत्तर द्यावं अशीही मागणी केली होती. ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाचीही मध्यस्थी भारताने सहन केली नाही, कुणीही यात मध्यस्थी केली नाही असं लोकसभेत झालेल्या म्हटलं होतं. आता या सगळ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा पुनरुच्चार केला आहे. आता याचे पडसाद कसे उमटणार हे पाहणंही महत्त्वाचं असेल.

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पहिल्यांदाच ट्रम्प यांचं भाषण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित केलं. दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचं संयुक्त राष्ट्राच्या महासभेला त्यांनी पहिल्यांदाच संबोधित केलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले मागच्या सात महिन्यांत मी सात युद्धं थांबवली आहेत. त्यामध्ये इराण इस्रायल युद्ध असो किंवा भारत पाकिस्तान युद्ध मी सात युद्ध थांबवली आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.