US President Donald Trump Said He Sanctioned India To Pressure Russia: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे दुसऱ्यांदा हाती घेतल्यापासून ते सतत चर्चेत आहेत. आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की, त्यांनी आतापर्यंत जगातील सात युद्धे थांबवण्यास मदत केली आहे, परंतु रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना निराश केले आहे. बकिंगहॅमशायर येथील ब्रिटीश पंतप्रधानांच्या चेकर्स निवासस्थानी केयर स्टारमर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर पुतिन यांच्यावर युक्रेन युद्धातून माघार घेण्याचा दबाव येईल.

ट्रम्प म्हणाले की, जर युरोपीय देशांनी रशियाकडून तेल खरेदी करणे सुरू ठेवले तर असे होणार नाही. ते म्हणाले की, जर तेलाच्या किमती कमी झाल्या तर रशिया सहजपणे तडजोड करेल.

मी भारताच्या खूप जवळचा

“मी भारताच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खूप जवळचा आहे. मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमचे खूप चांगले संबंध आहेत, पण तरीही मी त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत”, असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प म्हणाले की, “अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यापासून, ज्यावर आधी चर्चाही होत नव्हती ती युद्धे सोडवण्यात यशस्वी झालो आहे.”

भारत-पाकिस्तान शस्त्रविरामाचे श्रेय

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्ध रोखण्याचे श्रेय घेतले. ते म्हणाले की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सोडवण्यासाठी हस्तक्षेप केला होता.

ट्रम्प म्हणाले, “जर तुम्हाला (भारत आणि पाकिस्तान) आमच्यासोबत व्यापार करायचा असेल तर तुम्हाला एकत्र काम करावे लागेल आणि ते (भारत आणि पाकिस्तान) यावर जोमाने पुढे जात आहेत.”

भारताने दावा फेटाळला

दरम्यान, भारताने अनेकवेळा ट्रम्प यांचे दावे फेटाळत कोणत्याही तृतीय पक्षाने भारत-पाकिस्तान शस्त्रविरामात हस्तक्षेप केला नसल्याचे सातत्याने स्पष्ट केले आहे. दोन्ही सैन्याच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यातील थेट चर्चेनंतर पाकिस्तानशी संघर्ष संपवण्याचा करार झाल्याचे भारताने म्हटले आहे.

Live Updates