Donald Trump vs Venezuela President Nicolás Maduro : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका बाजूला जगभरातील वेगवेगळ्या देशांमधील आठ युद्ध रोखल्याचा दावा करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला अनेक देशांविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये करत आहेत, युद्धाची भाषा बोलत आहेत. भारतासह जगभरातील अनेक देशांवर भरमसाठ आयात शुल्क लावून अप्रत्यक्षपणे ट्रेड वॉर (व्यापार युद्ध) सुरू करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्याविरोधात आक्रमक वक्तव्य केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “व्हेनेझुएलाचे अध्यक्ष म्हणून निकोलस मादुरो यांचे दिवस आता भरले आहेत. त्या पदावर आता त्यांचे काहीच दिवस उरले आहेत.” अमेरिका गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच कॅरेबियन प्रदेशात सर्वात मोठं मिलिटरी अपग्रेडेशन करत असतानाच ट्रम्प यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ते युद्धाची तयारी करत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
अमेरिकेत होणाऱ्या घुसखोरीला मादुरो जबाबदार : डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प यांनी सीबीएस न्यूजला एक मुलाखत दिली आहे. यामध्ये ते म्हणाले, “मादुरो यांची राजवट केवळ अमेरिकेभोवती ड्रग्ज व अंमली पदार्थांचा विळखा घालत आहे. त्यांच्यामुळे अमेरिकेत गुन्हेगारी वाढली आहे. त्यांच्यामुळे व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. अमेरिकेत होणाऱ्या घुसखोरीला मादुरोच जबाबदार आहेत.”
“मादुरो यांनी व्हेनेझुएलामधील तुरुंग अमेरिकेत रिकामे केले”
“मादुरो आमच्याबरोबर खूप वाईट व्यवहार करत आहेत. त्यांच्यामुळे आपल्यासमोर ड्रग्जचं संकट उभं राहिलं आहे. तसेच त्यांनी लाखो लोकांना आपल्या देशात फेकून दिलं आहे. आम्हाला हे ओझं नको. तिकडच्या तुरुंगांमधील कैदी देखील अमेरिकेत आले आहेत. त्यांनी त्यांच्या देशातील तुरुंग आपल्या देशात रिकामे केले आहेत. त्यांनी त्यांच्या देशातील वेड्यांची रुग्णालये देखील अमेरिकेत रिकामी केली आहेत.”
अमेरिकेची अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी लष्करी कारवाई
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रं हाती घेतल्यापासून अमेरिका व व्हेनेझुएलात तणाव आहे. ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच मादुरो यांचा ‘नार्को-टेररिस्ट’ असा उल्लेख केला होता. तसेच त्यांच्यावर कथित अंमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप केला आहे. या अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अमेरिकेने आता लष्करी कारवाई सुरू केली आहे.
