पीटीआय, न्यूयॉर्क, नवी दिल्ली

आयातशुल्काच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मात्र, “दोन्ही देशांदरम्यान विशेष संबंध असून वादाचे असे क्षण उद्भवत असतात, त्यावरून चिंता करण्याचे कारण नाही,” असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ओव्हल ऑफिसमध्ये माध्यमांशी बोलताना, नरेंद्र मोदी हे थोर पंतप्रधान असून ते सदैव आपले मित्र राहतील असेही ट्रम्प म्हणाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांचे मूल्यांकन सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमावर व्यक्त केली.

भारत रशियाकडून करत असलेली तेलखरेदी आणि अमेरिकेने लादलेले भरमसाठ आयातशुल्क हे मुद्दे दोन्ही देशांदरम्यान तणावाचे मुख्य कारणे आहेत. अमेरिका भारताबरोबरचे संबंध पूर्ववत करायला तयार आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, “भारत आणि अमेरिकेचे संबंध विशेष आहेत. त्याबद्दल चिंता करायचे काहीच कारण नाही. आताही आमच्यात फक्त वाद निर्माण झाला आहे.” भारत रशियाकडून इतक्या प्रमाणात तेल खरेदी करत असल्याबद्दल आपण फार निराश झालो आहोत, असे ट्रम्प पुन्हा एकदा म्हणाले.

‘शांघाय सहकार्य संघटने’च्या वार्षिक परिषदेनिमित्त मोदी गेल्या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर, “भारत आणि रशिया हे देश चीनच्या अधिक जवळ गेल्याचे दिसत आहे,” असे ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ मीडियावर लिहिले होते.

पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्या शुक्रवारच्या विधानाचे वृत्त प्रसिद्ध करत त्यांच्या मताला दुजोरा देत असल्याचे ‘एक्स’वर लिहिले. “भारत आणि अमेरिकेदरम्यानचे संबंध अत्यंत सकारात्मक आहेत आणि सर्वंकष व जागतिक सामरिक भागीदारीकडे उत्सुकतेने पाहत आहोत,” असे मोदी यांनी नमूद केले आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान १७ जून रोजी दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणानंतर हे पहिलेच संभाषण होते.

माझी नरेंद्र मोदी यांच्याबरोबरची मैत्री कायम राहील. ते उत्कृष्ट पंतप्रधान आहेत. मी त्यांचा नेहमीच मित्र असेन, पण ते आता जे करत आहेत ते (रशियाकडून तेलखरेदी) मला अजिबात आवडत नाही. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

अध्यक्ष ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि आमच्या संबंधांचे त्यांनी केलेले सकारात्मक मूल्यांकन याची मी मनापासून प्रशंसा करतो आणि त्याला संपूर्ण दुजोरा देतो. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान