Donald Trump on Zohran Mamdani: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात लवकरच महापौर पदासाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत भारतीय वंशाचे जोहरान ममदानी विजयी होतील, असे वातावरण तयार झाले आहे. जून महिन्यात न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी डेमोक्रॅटिक प्रायमरीमध्ये ममदानी यांना मोठा विजय मिळवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी ममदानी यांचा उघड विरोध केलेला होता. आता त्यांनी न्यूयॉर्कच्या मतदारांना उद्देशून सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ममदानी जर निवडून आले तर याचे संभाव्य धोके काय असतील? याची ट्रम्प यांनी माहिती दिली.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ममदानी हे न्यूयॉर्क शहरातील स्वयंघोषित कम्युनिस्ट आहेत. ते जर महापौरपदाची निवडणूक जिंकले तर त्यांना वॉशिंग्टनकडून विरोधाचा सामना करावा लागेल.

न्यूयॉर्क सारख्या महान शहराच्या महापौराने इतिहासात कधीही वॉशिंग्टनशी वैर घेतले नव्हते. मात्र ममदानी यांच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतील. लक्षात ठेवा, महापौर म्हणून निवडून आल्यावर त्यांना त्यांच्या कम्युनिस्ट आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी माझ्याकडूनच निधीची गरज भासेल. त्यांना अजिबात निधी दिला जाणार नाही. मग त्यांना मतदान करण्यात काय अर्थ आहे?

डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, ही विचारसरणी हजारो वर्षांपासून अपयशी ठरत आली आहे. ती पुन्हा अपयशी ठरेल आणि हे होईलच.

डोनाल्ड ट्रम्प यांची ट्रुथ सोशल मीडियावरील पोस्ट

ममदानी यांनी दिले प्रत्युत्तर

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टला उत्तर देत असताना जोहरान ममदानी म्हणाले, माझ्या विजयाच्या शक्यतेमुळे ट्रम्प यांना खूप दुःख झाल्याचे दिसते. तसेच निधी कपातीच्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, हे केवळ राजकीय नाटक आहे.

जोहरान ममदानी कोण?

  • जोहरान ममदानी यांच्या आई-वडिलांचा जन्म भारतातील आहे. त्यांचे वडील महमूद ममदानी युगांडात शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि आई मीरा नायर भारतीय चित्रपट निर्मात्या आहेत.
  • जोहरान यांचा जन्म आणि संगोपन युगांडातील कंपाला येथे झाले आहे.
  • ते सात वर्षांचे असताना आपल्या पालकांसह न्यू यॉर्कला स्थलांतरित झाले.
  • २०१८ मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले आणि त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला सीरियन कलाकार रामा दुवाजीशी लग्न केले.

जोहरान ममदानी यांनी अमेरिकेमधील मेन राज्यातील बोडोइन कॉलेजमधून आफ्रिकाना स्टडीजमध्ये बॅचलर पदवी मिळवली आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी एक सल्लागार म्हणून काम केले आणि कमी उत्पन्न असलेल्या घरमालकांना बेदखल होण्यापासून रोखण्यास मदत केली आहे, असे न्यू यॉर्क असेंब्लीच्या वेबसाइटवरील त्यांच्या अधिकृत प्रोफाइलमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यापूर्वी ममदानी यांनी रॅप आणि लेखन क्षेत्रातही काम केले आहे.