पीटीआय, वॉशिंग्टन

‘भारताने रशियाकडून तेलखरेदी सुरूच ठेवली, तर भारताला जबर कर देत राहावा लागेल,’ अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. रशियाकडून तेलखरेदी थांबविण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. ‘एअर फोर्स वन’ विमानातून जाताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘भारताने रशियातून तेल खरेदी करणे थांबवले नाही, तर त्यांना मोठ्या प्रमाणावर कर देत राहावा लागेल. त्यांना (भारताला) तसे करण्याची इच्छा नाही असे वक्तव्यही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला रशियाकडून तेलखरेदी थांबविण्याबाबत आश्वासन दिल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात केले होते. त्यावर भारताने बाजारातील स्थितीशी जुळवून घेण्यासाठी तेलखरेदीमध्ये विविधता आणत असून, तिचा विस्तार करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

भारत-पाकमधील संघर्ष थांबविल्याचा दावा

भारत-पाकिस्तानमध्ये मे महिन्यात झालेला संघर्ष थांबविल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या संघर्षात सात विमाने पाडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नेमक्या कुठल्या देशाची ही विमाने पडली, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. १० मेपासून ट्रम्प सातत्याने दोन्ही देशांतील संघर्ष थांबविल्याचा दावा करीत आहेत.

‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, ‘कर लावण्याच्या धोक्यामुळे दोन्ही देशांतील संघर्ष थांबला. ते संघर्षाच्या दिशेने जात होते. ते अणुयुद्धही होऊ शकले असते.’ पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी लक्षावधी नागरिकांचे प्राण वाचविल्याबद्दल आपले कौतुक केल्याचेही ट्रम्प यांनी नमूद केले. भारताने ट्रम्प यांचा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे.

भारत आणि पाकिस्तानवर दोनशे टक्के कर लावण्याची धमकी मी दिली. असा कर लावला, तर तुम्हाला करार करता येणार नाही. आम्ही तुमच्याबरोबर व्यापार करणार नाही. असे सांगितल्यानंतर २४ तासांत युद्ध थांबले. -डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष