Jake Sullivan on Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर भरमसाठ आयातशुल्क लादून व्यापारकोंडी करण्याचा प्रयत्न केला. ट्रम्प यांच्या या निर्णयावर माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी टीका केली आहे. आता यात भर पडली ती अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांच्या विधानाची. ट्रम्प यांच्या कुटुंबियांचे पाकिस्तानशी व्यापारी संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी भारताशी असलेल्या संबंधात तडजोड केली, असा आरोप सुलिव्हन यांनी केला आहे.

जेक सुलिव्हन हे जो बायडेन यांच्या प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी होते. त्यांनी म्हटले की, ट्रम्प यांनी भारताच्या संबंधाशी तडजोड केल्यामुळे मोठे धोरणात्मक नुकसान होणार आहे.

मेडासटच या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुलिव्हन यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, अनेक दशकांपासून अमेरिकेने भारताशी द्विपक्षीय संबंधावर काम केले आहे. भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून त्यांच्याशी संबंध बळकट करण्यासाठी धोरण आखले गेले. भारत हा असा देश आहे, ज्याच्याशी आपण तंत्रज्ञान, प्रतिभा आणि अर्थशास्त्राविषयी काम करू शकतो. तसेच चीनच्या हालचालींना एकत्र तोंड देऊ शकतो. या आघाडीवर लक्षणीय प्रगती झाली होती.

ट्रम्प यांच्या कुटुंबाबरोबर पाकिस्तानचे व्यावसायिक करार झाल्यामुळे ट्रम्प यांनी भारताशी असलेले संबंध बाजूला ठेवले आहेत. हा एक मोठा धोरणात्मक धक्का आहे, असेही सुलिव्हन म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, भारताशी केलेल्या व्यवहारामुळे आता जर्मनी, जपान किंवा कॅनडा यासारखे इतर देशही विचार करतील की, उद्या आपल्याबरोबरही हेच होऊ शकते.

सुलिव्हन पुढे म्हणाले की, अमेरिकेचे मित्र किंवा इतर देश हे पुढे अमेरिकेवर अवलंबून राहणार नाहीत. यामुळे अमेरिकन जनतेला दूरगामी परिणामांना सामोरे जावे लागेल. आपले मित्र आपल्यावर विसंबून असतील तर ते आपले बलस्थान असते. अमेरिकेने आपल्या मित्र देशांना नेहमीच मदतीचा हात दिला आहे. परंतु सध्या भारताबरोबर जे घडत आहे, त्याचा मोठा परिणाम होत आहे.

ट्रम्प आणि पाकिस्तान संबंध

यावर्षी एप्रिल महिन्यात वर्ल्ड लिबर्टीने (WLF) क्रिप्टो उद्योगात गुंतवणूक आणि नव्या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी अधिकृतपणे पाकिस्तान क्रिप्टो परिषदेशी करार केला. करारावर स्वाक्षरी करण्याच्या समारंभावेळी अमेरिकन शिष्टमंडळात WLF चे सहअध्यक्ष आणि ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांचे पुत्र झाचेरी विटकॉफ यांचा समावेश होता.

जूनमध्ये, पाकिस्तानी सैन्याने दिलेल्या निवेदनात म्हटले की, फिल्ड मार्शल असीम मुनीर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत व्यापार, आर्थिक विकास आणि क्रिप्टोकरन्सीवर चर्चा झाली.

त्यानंतर जुलैमध्ये, ट्रम्प यांनी पाकिस्तानबरोबर व्यापार कराराची घोषणा केली आणि भारतीय वस्तूंवर २५ टक्के कर लावण्याची धमकी दिली.