Elon Musk On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून ते कोणत्या न कोणत्या मुद्यांवरून कायम चर्चेत आहेत. नवीन टॅरिफ धोरण, बेकायदेशीर स्थलांतरितांचा प्रश्न असेल किंवा हार्वर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांसंदर्भातील मुद्दा असेल अशा अनेक निर्णयामुळे ट्रम्प चर्चेत आहेत. खरं म्हणजे ट्रम्प सरकारमध्ये उद्योगपती इलॉन मस्क यांची देखील महत्वाची भूमिका राहिल्याचं मानलं जातं. मात्र, काही दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांनी एक मोठी घोषणा करत आपण ट्रम्प प्रशासनामधून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प हे एकमेकांवर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

इलॉन मस्क हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे विश्वासू मानले जातात. मात्र, आता इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. ‘मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प हे २०२४ ची निवडणूक हरले असते’, असा दावा इलॉन मस्क यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

इलॉन मस्क हे ट्रम्प सरकारमधून बाहेर पडल्यानंतर आता ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मस्क यांनी ट्रम्प सरकारच्या नव्या कर व खर्च विधेयकावर (Tax and Spending Bill) जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच याबाबत मस्क यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या विधेयकाचा ‘घृणास्पद कृत्य’ असा उल्लेख केला होता. तसेच या विधेयकामुळे खूप तोटा होईल असंही म्हटलं होतं. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाने आणलेल्या नव्या कर विधेयकात इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी सूट रद्द करण्यात आल्यामुळे इलॉन मस्क हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

इलॉन मस्क यांनी केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना डोनाल्ड ट्रम्प नुकतंच म्हणाले होते की, “इलॉन मस्क आणि माझे पूर्वी चांगले संबंध होते. पण आता मला माहित नाही की आम्ही एकत्र राहू शकू की नाही? इलेक्ट्रिक-वाहनांवरील कर याबाबतच्या निर्णयानंतर टेस्ला प्रमुख निराश झाले असावेत. मी देखील मस्क यांच्याबाबत खूप निराश आहे. मी त्यांना खूप मदत केली”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

इलॉन मस्क यांनी काय म्हटलं?

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत बोलताना इलॉन मस्क यांनी म्हटलं की, “माझ्याशिवाय ट्रम्प निवडणूक हरले असते. डेमोक्रॅट्सना प्रतिनिधी सभेत बहुमत मिळालं असतं. रिपब्लिकन पक्षाला सिनेटमध्ये फक्त ५१ किंवा ४९ मतांनी आघाडी मिळाली असती”, असं मस्क यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची अमेरिकत चर्चा रंगली आहे.