Uttar Pradesh Headmaster beats Officer : उत्तर प्रदेशातील सीतापूरमधील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने थेट शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन शिक्षण अधिकाऱ्यालाच बेल्टने मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या घटनेबाबत आता उत्तर प्रदेशचे तंत्रशिक्षण मंत्री आशिष पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच हल्ल्याची ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं पटेल यांनी म्हटलं आहे. मंत्री आशिष पटेल यांनी म्हटलं की, “सीतापूरमधील शिक्षकाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एक मेहनती, प्रामाणिक आणि नियमित शाळेत जाणारे वर्मा यांना त्रास देण्यात आला, त्यांचा छळ करण्यात आल्यामुळे त्यांना राग अनावर झाला. फक्त २० सेकंदांच्या व्हिडीओ क्लिपच्या आधारे शिक्षकाला दोष देणं अन्यायकारक आहे.”

“कार्यालयात प्रवेश केल्यापासून ते शेवटपर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल. शिक्षकाने हे कृत्य कोणत्या परिस्थितीत केलं? सत्य उघड झालं पाहिजे. या घटनेची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल” असं मंत्री आशिष पटेल यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

सीतापूर जिल्ह्यातील एका शाळेतील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची चौकशी सुरू असताना एका प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यावर मुख्याध्यापकाने कार्यालयात हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आता पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना बीईओ अधिकारी अखिलेश प्रताप सिंह यांनी आरोप केला की, “सीतापूरच्या महमूदाबाद भागातील एका प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वर्मा हे शाळेतील एका सहाय्यक शिक्षिकेला त्रास देत होते. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर त्यांना याबाबत चर्चा करण्यासाठी कार्यालयात बोलावलं होतं.”

सिंह यांनी मुख्याध्यापक आणि सहाय्यक शिक्षक दोघांनाही समोरासमोर बोलावून चौकशी केली. मात्र, याचवेळी जेव्हा उपस्थित असलेल्या सर्वांनी मुख्याध्यापक दोषी असल्याचा आरोप केल्यानंतर ते अचानक संतापले आणि त्यांनी त्यांचा बेल्ट काढून माझ्यावर हल्ला केला, असा आरोप सिंह यांनी केला आहे.