Eknath Shinde : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात जेव्हा महाराष्ट्र गीत सुरु झालं तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या कृतीने त्यांनी सगळ्या महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर

दिल्लीत शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर होते. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण पाहण्यास मिळालं होतं. मात्र ते सगळं विसरुन आज हे दोन नेते दिल्लीत एकत्र आले. दिल्लीत सुरु असलेल्या साहित्य संमेलनात एकनाथ शिंदेंचा गौरव करण्यात आला. यावेळी शरद पवार हे राजकारणात गुगली टाकतात तेव्हा भल्याभल्यांची विकेट जाते पण त्यांनी मला कधी गुगली टाकली नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

महादजी शिंदेंबाबत एकनाथ शिंदेंचे गौरवोद्गार

महादजी शिंदे हे आभाळाएवढं व्यक्तिमत्व होतं. ते महाप्रतापी रणधुरंधर होते. आदर्श शासक होते, कुशल योद्धे होते आणि खऱ्या अर्थाने महानायक होते. पानिपतचं युद्ध इतकं भीषण होतं की मराठा साम्राज्याचा अस्त झाला अशी स्थिती तेव्हा निर्माण झाली होती. कुठेही आशेचा किरण नव्हता. अशा परिस्थितीत महादजी शिंदेंनी पराक्रम गाजवून दिल्ली जिंकली आणि भगवा फडकवला हा इतिहास आहे. १० फेब्रुवारीला म्हणजे कालच या पराक्रमाला २५४ वर्षे पूर्ण झाली असंही एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या कृतीने सगळ्यांची मनं तर जिंकली पण त्या कृतीने त्यांनी महाराष्ट्राचंही मन जिंकलं.

दिल्लीत नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सदनात या क्रार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं झाली. शामिमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत गायलं. शामिमा अख्तर जेव्हा महाराष्ट्र गीत गात होत्या तेव्हा सर्वजण खालीच बसले होते. मात्र ही गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येताच ते स्वत: उभे राहिले अन् त्यांनी इतरांना देखील उभं राहिला सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही कृती छोटीशीच होती. पण या कृतीने त्यांच्या मनात असलेला महाराष्ट्राबाबतचा आदर दिसून आला अशी चर्चा दिल्लीत रंगली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde action won the hearts of maharashtra what exactly happened in delhi scj