Elon Musk Starship Mission: अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांची व्यावसायिक अंतराळ उड्डाण कंपनी, स्पेसएक्सला बुधवारी आणखी एक धक्का बसला. स्टारशिपच्या नवव्या चाचणी उड्डाणाने प्रक्षेपणानंतर सुमारे २० मिनिटांनी नियंत्रण गमावले. त्यानंतर, हिंदी महासागरावरून पृथ्वीच्या वातावरणात परतताना त्याचा अपघात झाला.

जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिपचे नववे चाचणी उड्डाण टेक्सासच्या बोका चिका येथून प्रक्षेपित करण्यात आले होते. एलॉन मस्क यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीही त्यांच्या कंपनीची अनेक चाचणी उड्डाणे अयशस्वी झाली आहेत.

स्टारशिपच्या माध्यमातून, एलॉन मस्क यांचे चंद्र आणि मंगळावर लोकांना वसवण्याचे स्वप्न आहे. या मिशनचे नाव ‘रोड टू मेकिंग लाईफ मल्टीप्लॅनेटरी’ असे आहे. मस्क यांनी नुकतेच सांगितले होते की, स्टारशिप रॉकेट मंगळावर ६ महिन्यांत प्रवास करू शकते, तर पूर्वी असे मानले जात होते की त्यासाठी १० वर्षे लागतील.

स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांनी या घटनेची माहिती देताना, या मिशनची प्रगती आणि अपयशाला कारणीभूत असलेल्या तांत्रिक समस्यांवर प्रकाश टाकला.

अपघातातही सकारात्मक गोष्ट

मस्क यांनी सांगितले की, “स्टारशिपने त्यांचे नियोजित मुख्य इंजिन कटऑफ साध्य केले असून, यामध्ये मागील उड्डाणांपेक्षा लक्षणीय सुधारणा झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, उड्डाणादरम्यान हीट शील्ड टाइल्सचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही, जी अंतराळयानाच्या थर्मल प्रोटेक्शन सिस्टमसाठी एक सकारात्मक गोष्ट आहे.”

दरम्यान आधीच्या उड्डाणांमध्ये चिंतेचा विषय ठरलेल्या हीट शील्डने यावेळी चांगली कामगिरी केली असल्याचे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.

…अन् रॉकेट नियंत्रणाबाहेर गेले

“पण, शेवटी, पुनर्प्रवेश टप्प्यांदरम्यान मुख्य टाकीचा दाब कमी झाल्यामुळे गळती झाली आणि मिशनला धोका निर्माण झाला. हा दाब कमी झाल्यामुळे रॉकेट नियंत्रणाबाहेर गेले आणि पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा वेगाने प्रवेश करत असताना ते कोसळले”, असे मस्क यांनी पुढे सांगितले.

रोड टू मेकिंग लाईफ मल्टीप्लॅनेटरी

‘रोड टू मेकिंग लाईफ मल्टीप्लॅनेटरी’ मिशन अंतर्गत मस्क आपले स्वप्न पूर्ण करणार आहे. स्टारशिप फ्लाइट ९ हे स्पेसएक्सचे मेगारॉकेट आहे जे मंगळाव्यतिरिक्त चंद्रावरही पाठवले जाईल. याची लाँच विंडो दक्षिण टेक्सासमधील एका गावाजवळील बोका चिका येथे सुरू करण्यात आली आहे.