Elon Musk Vs Sam Altman : टेस्ला कंपनीचे संस्थापक आणि सीईओ इलॉन मस्क (Elon Musk) हे आपल्या अनेक निर्णयांमुळे कायम चर्चेत असतात. इलॉन मस्क यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखलं जातं. आता इलॉन मस्क यांनी आर्टिफिशीअल इंटेलिजन्स कंपनी अर्थात ‘ओपन एआय’ला विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. इलॉन मस्क यांनी ही कंपनी ९.४ बिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास ८४ हजार ६०० कोटी रुपयांना विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे अनेकांच्या नजरा याकडे लागल्या होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इलॉन मस्क यांची ही ऑफर ‘ओपन एआय’चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी धुडकावून लावली आहे. तसेच ‘आम्हीच ट्विटर विकत घेतो’, अशी प्रति ऑफरच सॅम अल्टमन इलॉन मस्क यांना दिली आहे. सॅम ऑल्टमन यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये सॅम ऑल्टमन यांनी म्हटलं की, “धन्यवाद. पण तुम्हाला हवं असल्यास आम्हीच ९.७४ अब्ज डॉलरमध्ये ट्विटर (एक्स ) विकत घेऊ शकतो.” या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

दरम्यान, २०१५ मध्ये इलॉन मस्क आणि सॅम अल्टमन यांनी ओपन एआय या कंपनीची स्थापना केली होती. मात्र, पुढे २०१८ इलॉन मस्क हे कंपनीपासून वेगळे झाले. त्यानंतर इलॉन मस्क यांनी २०२३ मध्ये ‘ओपन एआय’ची स्पर्धक असलेली ‘एक्स एआय’ ही कंपनी सुरु केली. त्यानंतर इलॉन मस्क यांनी ‘ओपन एआय’वर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत खटला देखील दाखल केला होता. दरम्यान, इलॉन मस्क आणि सॅम अल्टमन हे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील दोन दिग्गजांनी एकमेकांना दिलेल्या ऑफरमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दरम्यान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयबद्दलचे दावे जगभर मजबूत होत आहेत. तसेच ते जगाचे चित्र बदलेल, अशी आशाही व्यक्त केली जात आहे. सॅम ऑल्टमन यांचे नाव एआय क्षेत्रातील उद्योग जगतातील नावाजलेल्या लोकांमध्ये घेतले जाते. मात्र, इलॉन मस्क यांची सॅम ऑल्टमन यांच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ५०० डॉलर बिलियन स्टारगेट प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच मस्कने सांगितलं होंत की या ग्रुपकडे पैसे नाहीत. तेव्हाही सॅम ऑल्टमन यांनी इलॉन मस्क यांचे दावे फेटाळून लावले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk vs sam altman openai ceo sam altman offer to tesla company founder elon musk we buy twitter gkt