Viral Video : इंग्लंडमध्ये पान खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कारण इंग्लंडमधील काही रस्ते आणि कचराकुंड्या थुंकून-थुंकून लाल होत असल्याचा एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये कचऱ्याचे डबे, फुटपाथ आणि रस्त्यांवर थुंकूल्यामुळे त्यावर गडद लाल रंगाच्या खुणा दिसत आहेत. हा व्हिडीओ लंडनमधील असून रेयर्स लेन ते नॉर्थ हॅरोपर्यंत पसरलेल्या या भागात ही परिस्थिती असल्याची माहिती समोर आली आहे.
रेयर्स लेन जिल्ह्यातील एका रहिवाशाने असा दावा केला की पान खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या वाढत असून यामुळे रस्त्यावरील आणि कचराकुंड्यावरील थुंकलेले डाग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेषतः पान खाणारे आणि तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांबाहेर आणि भोजनालयांबाहेर हीच परिस्थिती दिसत असल्याचा दावा या रहिवाशाने केला आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
वृत्तानुसार, नॉर्थ हॅरोमध्ये काही ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या पान दुकानांच्या विरोधात लोकांनी याचिका दाखल केली आहे. या दुकानांमुळे परिसरात पान खाऊन थुंकणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता याचिकाकर्त्यांनी वर्तवली आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर अनेक लोकांनी या परिस्थितीसाठी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या घटनेला स्थलांतरितांना आणि विशेषतः भारतीय समुदायाला जबाबदार धरलं आहे.
दरम्यान, या संदर्भात सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत. या संदर्भात एका व्यक्ताने टिप्पणी केली आहे की, ‘भारताची प्रतिमा खराब करण्यासाठी आपल्याला इतर लोकांची गरज नाही. आपले लोक आधीच संपूर्ण जगात त्यांचे सर्वोत्तम काम करत आहेत.’ तसेच दुसऱ्या एकाने म्हटलं की, ‘भारतीय पासपोर्टची प्रतिष्ठा गमावण्याचं हे एक कारण.’ तसेच आणखी एकाने म्हटलं की, ‘ब्रिटिशांनी भारत ताब्यात घेतला, आता भारतीय ब्रिटन ताब्यात घेत आहेत’, असं एकाने म्हटलं आहे.
दरम्यान, यापूर्वी २०१९ मध्ये लेस्टर सिटी पोलिसांनी इंग्रजी आणि गुजराती भाषेत द्विभाषिक बोर्ड लावले होते. त्यामध्ये तेथील रहिवाशांना पान खाऊन थुंकण्याबाबत इशारा देण्यात आला होता. त्या फलकावर लिहिलं होतं की, “रस्त्यावर पान खाऊन थुंकणं हे अस्वच्छ आणि समाजविरोधी आहे. त्यामुळे तुम्हाला दंड होऊ शकतो.”, तसेच याचं उल्लंघन केल्यास $१५० (अंदाजे १२,५२५ रुपये) दंड आकारला जाऊ शकतो, असं सांगितलं होतं.