Ex RAW chief Vikram Sood on US Pakistan Relations : भारताची गुप्तचर यंत्रणा रिसर्च अ‍ॅन्ड अ‍ॅनालिसिस विंगचे (रॉ) प्रमुख विक्रम सूद यांनी पाकिस्तान व अमेरिकेची वाढती मैत्री, पाकिस्तानबरोबर चालू असलेला भारताचा संघर्ष, पहलगाममधील दहशतवादी हल्ला, आशियाई चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोहसीन नक्वी यांनी घातलेला गोंधळ यावर भाष्य केलं. ते म्हणाले, “पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू झाला होता. हा लष्करी संघर्ष मी थांबवला असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, भारताने ट्रम्प यांचा दावा कधीच मान्य केला नाही. त्यामुळेच ट्रम्प यांनी पाकिस्तानशी जवळीक वाढवली आहे.”

विक्रम सूद म्हणाले, “अमेरिका सध्या डीप स्टेटच्या (पडद्यामागून कटकारस्थानं करणारा देश) भूमिकेत आहे. भारताची ताकद वाढतेय आणि अमेरिका भारताच्या आर्थिक प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरत आहे. विक्रम सूद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, ट्रम्प यांच्या वैयक्तिक नाराजीतून हे सगळं सुरू झालं आहे. भारताने त्यांना भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचं श्रेय देण्यास नकार दिल्यामुळे ट्रम्प यांचा थयथयाट होतोय.”

…म्हणून पाकिस्तान व अमेरिकेची मैत्री वाढतेय : विक्रम सूद

रॉचे माजी अध्यक्ष म्हणाले, “ट्रम्प यांनी युद्ध रोखल्याचा दावा केल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांनी मात्र ट्रम्प यांच्यासमोर गुडघे टेकले होते. ते ट्रम्प यांना म्हणाले, धन्यवाद, माझे स्वामी. त्यानंतर पाकिस्तान व ट्रम्प यांच्यात मैत्री वाढू लागली. हे सगळं डीप स्टेटचं कारस्थान आहे. भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ नये असं त्यांना वाटतं.”

अमेरिकेची पाकिस्तान व असीम मुनीर यांच्यावर स्तुतीसुमने

विक्रम सूद म्हणाले, “भारताची वेगाने होत असलेली आर्थिक प्रगती अमेरिकेला बघवत नाहीये. भारत व चीन या जगातील दोन नव्या मोठ्या महासत्ता आहेत. आपण जेव्हा राष्ट्रवादाबद्दल चर्चा करतो तेव्हा काही लोक याला हिंदू राष्ट्रवाद अशी टिप्पणी करून नाकारतात. खरंतर चीन मोठी आर्थिक शक्ती बनला आहे. भारतही त्याच मार्गावर आहे आणि हे अमेरिकेला खुपतंय. अमेरिका सातत्याने भारताला डिवचतेय. तर, पाकिस्तानवर स्तुतीसुमने उधळतेय. ट्रम्प यांनी नुकताच पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अत्यंत महत्त्वाची व्यक्ती असा उल्लेख केला होता.”