Rape in Metaverse : जगभरात लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. वास्तविक जगात या घटना वाढत असताना आता आभासी जगातही महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलंय. मेटाव्हर्स या आभासी जगात व्हर्च्युअल रिअॅलिटी व्हिडीओ गेम खेळणाऱ्या एका मुलीवर पाच जणांनी बलात्कार केल्याचं वृत्त आहे. या लैगिंक आघातामुळे पीडितेला शारीरिक इजा झालेली नसली तरीही तिच्यावर मानसिक आणि भावनिक आघात झाला आहे. ब्रिटनमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी मेटावर्स येथील पहिल्या बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेटाव्हर्स हे डिजिटल जग आहे. या जगात आपण आपले डिजिटल अवतार बनवून जगभरातील लोकांशी संवाद साधू शकतो, त्यांच्याबरोबर फिरू शकतो, शॉपिंग करू शकतो. वास्तविक जगात ज्या गोष्टी शक्य आहेत, त्या सर्व गोष्टी मेटाव्हर्सच्या डिजिटल जगातही शक्य आहे. याच मेटाव्हर्समध्ये एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी सामूहिक बलात्काराला बळी पडली आहे. फक्त फरक इतकाच आहे की हा बलात्कार प्रत्यक्षात शारिरीक नसून पीडित मुलीच्या डिजिटल अवतारावर झालेला आहे. पीडित मुलगी व्हर्च्युअल व्हिडीओ गेम खेळत होती. तेव्हा पाच पुरुषांनी तिच्या डिजिटल अवतारावर बलात्कार केला. तिच्यावर बलात्कार झाला तेव्हा तिचं डिजिटल पात्र मोठ्या संख्येने इतर वापरकर्त्यांसह ऑनलाईन रुममध्ये होते. दरम्यान, यावेळी ती नेमकी कोणता गेम खेळत होती हे स्पष्ट झालेलं नाही.

मेटाव्हर्समध्ये गुन्हेगारांना संधी

नॅशनल पोलिस चीफ कौन्सिलचे चाइल्ड प्रोटेक्शन अँड अब्यूज इन्व्हेस्टिगेशन अध्यक्ष इयान क्रिचले याबाबत म्हणाले, मेटाव्हर्समध्ये लैंगिक गुन्हेगारांना गुन्हे करण्याची संधी मिळते. त्यामुळे अशा प्रकरणांविरोधात आम्ही कारवाई करत आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षितपणे होत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.

पोलिसांसमोरील आव्हाने वाढली

गेल्या काही वर्षांत गुन्हेगारांचे प्रकार वाढले आहेत. वास्तविक जगातील गुन्हे डिजिटल रुपातही होत असल्याने पोलिसांसमोरील आव्हाने वाढली आहेत. याबाबत क्रिचले म्हणाले, “आमचा पोलिसिंग दृष्टीकोन सतत विकसित केला पाहिजे. यामुळे आम्हाला गुन्हेगारांचा पाठलाग करून पीडितांना संरक्षण देता येईल.

डिजिटल ओळख लपवणं कठीण

डिजिटल ओळख संरक्षित करणे आणि वापरकर्त्याची सुरक्षा सुनिश्चित करणे संस्थांसाठी हळूहळू आव्हानात्मक बनत आहे. व्हर्च्युअल रिअॅलिटी स्पेसचे पोलिसिंग करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह वास्तविक-जगातील कायद्याची अंमलबजावणी आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: First rape in metaverse teenage girls avatar sexually attacked by men in virtual reality game in uk probe launched sgk