First Reaction Of Rakesh Kishore who Threw Shoes At CJI B. R. Gavai: सर्वोच्च न्यायालयात काल (सोमवारी) सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारे ७१ वर्षीय वकील राकेश किशोर यांनी म्हटले आहे की, त्यांना या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. याचबरोबर, “आपण तुरुंगवास भोगण्यास तयार आहोत” आणि “दैवी शक्तीमुळे” हे कृत्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे, असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राकेश कुमार म्हणाले की, “न्यायाधीशांनी संवेदनशीलतेने काम करावे. लाखो खटले प्रलंबित आहेत. मी माफी मागणार नाही आणि मला पश्चात्तापही नाही. मी काहीही केलेले नाही. दैवी शक्तीने मला हे करण्यास भाग पाडले.”
मयूर विहारमध्ये राहणारे वकील राकेश किशोर यांनी आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. मध्य प्रदेशातील खजुराहोच्या जावरी मंदिरात शिरच्छेद केलेल्या भगवान विष्णूच्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणाऱ्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी केलेल्या टिप्पण्यांमुळे आपण संतप्त झालो होतो, असा दावा राकेश किशोर यांनी केला आहे.
मी तुरुंगात असतो तर बरे झाले असते
या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना वकील राकेश किशोर म्हणाले की, “मी तुरुंगात असतो तर बरे झाले असते. माझ्या कृत्यामुळे माझे कुटुंबीय खूप नाराज आहे. ते समजू शकत नाहीत.”
खजुराहो खटल्यातील विष्णू मूर्तीचा संदर्भ देत किशोर म्हणाले की, “त्या निकालानंतर मला झोप येत नव्हती. सर्वशक्तिमान देव मला दररोज रात्री विचारत होते की, इतक्या अपमानानंतरही मी इतका शांत कसा राहू शकतो.”
त्यांनी पुढे सांगितले की, मॉरिशसमधील सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या भाषणाबद्दल कळल्यानंतर ते आणखी संतप्त झाले होते. जिथे बी. आर. गवई म्हणाले होते की, “भारताची न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमांनुसार चालते, बुलडोझरच्या नियमांनुसार नाही.”
कोण आहेत राकेश किशोर?
पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, राकेश किशोर हे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य आहेत आणि ते दिल्लीच्या मयूर विहार परिसरात राहतात. त्यांनी २००९ मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली होती. ज्येष्ठ वकील असलेले राकेश किशोर हे अनेक वर्षांपासून विविध बार असोसिएशन्सचे सदस्य राहिले आहेत. पोलिसांना राकेश किशोर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन, शाहदरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार कौन्सिलचे सदस्यत्व कार्ड असल्याचे आढळले, असे वृत्त बार अँड बेंचने दिले आहे.