Satyapal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन झालं आहे. दिल्लीच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. १९७४ मध्ये बागपत येथून विधानसभा निवडणूक लढवत त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरु केली होती. आज रुग्णालयांत उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात सुरु होते उपचार
आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सत्यपाल मलिक यांची प्राणज्योत मालवली. प्रदीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दीर्घ काळापासून सत्यपाल मलिक किडणीच्या विकारांनी त्रस्त होते. त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने ११ मे रोजी त्यांना दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णालयात उपचार घेत असताना सत्यपाल मलिक यांची प्राणज्योत लमावली.
सत्यपाल मलिक यांचा राजकीय प्रवास सपापासून सुरु झाला होता
सत्यपाल मलिक यांचा प्रवास सपामधून सुरु झाला होता, ते काही काळ भाजपातही कार्यरत होते. मात्र, अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केल्याने त्यांच्याकडे देशभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. अशा महत्त्वाच्या क्षणी प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांच्याकडे होती. सत्यपाल मलिक यांच्याच कार्यकाळात जम्मू काश्मीर आणि लडाख असे भाग करण्यात आले होते. दरम्यान, सत्यपाल मलिक यांना ३ नोव्हेंबर २०१९ ला गोव्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकावर गंभीर आरोप केले होते, जवानांना हेलिकॉप्टर देण्याऐवजी बसने पाठविण्यात आल्याचे सांगत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यांच्या या आरोपानंतर ते दशभरात चर्चेत आले होते.