पीटीआय, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हिमाचल प्रदेश व पंजाब या राज्यांतील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. हिमाचल प्रदेशसाठी १५०० कोटी, तर पंजाबसाठी १६०० कोटी रुपयांची आर्थिक मदत पंतप्रधानांनी जाहीर केली. पंजाब राज्याला देण्यात आलेल्या १२,००० कोटी रुपयांच्या निधीव्यतिरिक्त एसडीआरएफ आणि पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दुसरा हप्ता आगाऊ जारी केला जाईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यांतील पूरग्रस्त भागांचा आढावा घेण्यासाठी हवाई सर्वेक्षण केले. त्यानंतर गुरुदासपूर येथे बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंजाबमधील पूरग्रस्त भागांत मदत करण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोनाची गरज अधोरेखित केली. यामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे पुनर्बांधणी, राष्ट्रीय महामार्ग पुनर्संचयित करणे, शाळांची पुनर्बांधणी, ‘पीएमएनआरएफ’द्वारे मदत आणि पशुधनासाठी मिनी किट वाटप यांसारख्या उपाययोजनांचा समावेश असेल. कृषी समुदायाला आधार देण्याची महत्त्वाची गरज ओळखून, सध्या वीज जोडणी नसलेल्या शेतकऱ्यांना लक्ष्य करून अतिरिक्त मदत दिली जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.
हिमाचल प्रदेशातील पूर आणि भूस्खलन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले.