Gang Rape on Girl : वाढदिवसाच्या बहाण्याने एका २० वर्षांच्या तरुणीला घरी बोलवून तिच्या वर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींची ओळख पटवली आहे. चंदन आणि दीप अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांचा शोध सध्या सुरु आहे कारण बलात्काराच्या घटनेनंतर हे दोघं फरार झाले आहेत. कोलकाता येथील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींनी तिला वाढदिवसाचं कारण सांगून घरी बोलवलं होतं.

पोलिसांनी काय सांगितलं?

कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० वर्षांच्या तरुणीवर चंदन आणि दीप या दोघांनी सामूहिक बलात्कार केला. चंदनने तिला सांगितलं की तुझा वाढदिवस आहे तू दीपच्या घरी ये आपण तिथे तुझा वाढदिवस साजरा करु. या बहाण्याने तिला दीपच्या घरी चंदन घेऊन गेला. शुक्रवारी सदर तरुणीचा वाढदिवस होता. त्यासाठी चंदन तिला दीपच्या घरी घेऊन गेला. तिथे या तिघांनी एकत्र पार्टी केली. यानंतर जेव्हा ती म्हणाली की आता मी घरी जाते तेव्हा या दोघांनी तिला थोडावेळ थांब असं सांगितलं. दरवाजा लावून घेतला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

शनिवारी कशीबशी दोघांच्या तावडीतून तरुणी सुटली

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास तरुणी तिथून पळ काढला. घरी आल्यानंतर तिने तिच्या कुटुंबाला सगळी घटना सांगितली. यानंतर तिला घेऊन घरातल्यांनी पोलीस ठाणं गाठलं आणि पीडितेची तक्रार नोंदवून घेतली. या घटनेनंतर दीप आणि चंदन या दोघांचा शोध सुरु आहे. पण दोघंही फरार आहेत असंही पोलिसांनी सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

पीडितेने काय सांगितलं?

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी तिची आणि चंदनची ओळख झाली होती. मी दक्षिण कोलकाता या ठिकाणी असलेल्या दुर्गा पूजा समितीचा प्रमुख आहे असं तिला सांगितलं होतं. यानंतर काही दिवसांनी तिची ओळख दीपशी झाली. तिघंही एकमेकांच्या संपर्कात होते कारण त्या तिघांची चांगली मैत्री झाली होती. तुला आम्ही दुर्गा पूजेच्या समितीत सहभागी करुन घेऊ असं आश्वासन मला चंदन आणि दीप या दोघांनीही दिलं होतं असंही या तरुणीने सांगतिलं. कोलकाता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरलं आहे.

कोलकाता मध्ये बलात्काराच्या वाढत्या घटना

कोलकाता हे शहर महिलांसाठी सुरक्षित मानलं जातं मात्र या शहरात बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. याआधी २५ जूनला दक्षिण कोलकाता भागात एका लॉ कॉलेजच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याला अटक करण्यात आली.