Donald Trump On Vladimir Putin : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून ते आजपर्यंत अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावला आहे. आयात शुल्कासह बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यांसह आदी मोठ्या निर्णयांचा सहभाग आहे. या निर्णयामुळे जगातील अनेक देशांना मोठा फटका देखील बसला. काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरिया, जपानसह १२ देशांवर नव्याने टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला.
तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी BRICS देशांनाही आर्थिक भुर्दंडाचा इशारा दिला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी थेट रशियाला धमकी दिली होती की जर व्लादिमीर पुतिन यांनी ५० दिवसांत युक्रेन बरोबरील युद्धबंदी करण्यास सहमती दर्शवली नाही तर रशिया विरुद्ध कठोर टॅरिफ लागू करण्यात येईल. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला पुन्हा एकदा धमकी देत रशियाला १० ते १२ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
‘व्लादिमीर पुतिन यांच्याकडे युक्रेन शांतता कराराला सहमती देण्यासाठी फक्त पुढील १० किंवा १२ दिवस आहेत. पुढील १० किंवा १२ दिवसात रशियाने शांतता कराराला सहमती दिली नाही तर रशियाला कठोर निर्बंधांना सामोरं जावं लागेल’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसेच युक्रेनबरोबरील संघर्ष लांबवल्यामुळे व्लादिमीर पुतिन यांच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “काय होणार आहे हे त्यांना माहित असल्यामुळे इतकी वाट पाहण्यात काही अर्थ नाही”, असं ट्रम्प म्हणाले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की,”रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल निराशा वाढल्यामुळे आता मी कठोर निर्बंधांबाबतचं सुधारित वेळापत्रक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मी त्यांना दिलेले ५० दिवस कमी करणार असून आता मॉस्कोला १० ते १२ दिवसांचा कालावधी असेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. दरम्यान, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की,”अल्टीमेटम, ब्लॅकमेल आणि धमक्यांची भाषा मॉस्कोला अस्वीकार्य आहे.”
ट्रम्प यांनी याआधीही रशियाला दिला होता ५० दिवसांचा अल्टिमेटम
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, “युक्रेनबरोबरील युद्धबंदी करण्यास रशियाने सहमती दर्शवली नाही आणि ५० दिवसांत आमचा करार झाला नाही तर आम्ही रशियावर दुय्यम कर लादणार आहोत आणि मग ते १०० टक्के टॅरिफ असेल”, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता.
ट्रम्प यांनी BRICS देशांनाही दिला होता इशारा
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी ब्रिक्स देशांना देखील मोठा इशारा दिला होता. जो कोणता देश ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांबरोबर जाईल, त्या देशांवर १० टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादलं जाईल, तसेच या धोरणाला कोणताही देश अपवाद असणार नाही, अशी इशारावजा धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती.