Goa Health Minister Vishwajit Rane : गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका डॉक्टरांचं तडकाफडकी निलंबन केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी एका वरिष्ठ डॉक्टरवर रुग्णांशी उद्धटपणे बोलल्याचा आरोप करत तात्काळ सस्पेंड ऑर्डर काढण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणाची आता गोव्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणावरून गोवा सरकारवर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय घडलं?

गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील एका वरिष्ठ डॉक्टरांना निलंबित करण्याचे आदेश गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिले असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शनिवारी बांबोलीम येथील एका मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला अचानक भेट दिली. या भेटीवेळी एका वरिष्ठ डॉक्टरने रुग्णावर उपचार करण्यास नकार दिल्याचा आणि रुग्णांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच याचवेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी संबंधित वरिष्ठ डॉक्टरला थेट निलंबन करण्याचे आदेश दिले. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असंही दिसत आहे की, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना त्यांच्या फोनवर आलेल्या तक्रारीनंतर ते डॉक्टरांवर संतापले आहेत. तसेच यावेळी बोलताना ते संबंधित वरिष्ठ डॉक्टरांना म्हणाले की, “रुग्णांशी कसं वागायचं हे शिकून घ्या. तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायला शिका”, असं म्हणत आरोग्यमंत्री डॉक्टरांवर चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे पुढे असंही म्हणताना दिसत आहेत की, “तुम्ही तुमच्या जिभेवर नियंत्रण ठेवायला शिका, तुम्ही डॉक्टर आहात ना? मी सहसा माझा संयम गमावत नाही. कितीही भार असला तरी तुम्हाला रुग्णांबरोबर गैरवर्तन करता येणार नाही. त्यांच्याबरोबर योग्य संवाद साधला पाहिजे”, असंही आरोग्यमंत्री राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री राणे संबंधित डॉक्टरांना उद्देशून म्हणाले की, “त्यांच्या जागी दुसऱ्या सीएमओची नियुक्ती करा. मी त्यांच्या निलंबनाच्या फाईलवर सही करेन. मला त्यांना ताबडतोब निलंबित करायचं आहे. मी सहसा उद्धटपणे वागत नाही, पण मी हे आता सहन करू शकत नाही”, असं म्हणत आरोग्यमंत्री राणे यांनी तात्काळ संबंधित डॉक्टरांची सस्पेंड ऑर्डर काढण्याचे आदेश दिले.

गोवा काँग्रेसने काय म्हटलं?

“गोव्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम करण्यास हे मंत्री खरोखरच योग्य आहेत का? त्यांच्या वर्तनामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर जबाबदारीने देखरेख करण्याच्या त्यांच्या क्षमतेबद्दल गंभीर चिंता निर्माण होत आहे. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये विश्वजित राणे यांनी एका वरिष्ठ डॉक्टरांचा कॅमेऱ्यासमोर सार्वजनिकरित्या अपमान करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना आणि अहंकार आणि हुकूमशाहीचे लाजिरवाणे प्रदर्शन आहे. मानवतेच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित करणारे डॉक्टर असा आपमान नाही तर सन्मानास पात्र आहेत. अशा कृती केवळ कॅबिनेट मंत्र्यांसाठी अयोग्य आहेत. अशा नेतृत्वाखाली गोव्याचं आरोग्य विभाग धोक्यात आहे”, असं गोवा काँग्रेसच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे.