Haryana IPS officer Y Puran Kumar Dies by Suicide : हरियाणामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. हरियाणाचे सहाय्यक पोलीस महासंचालक वाय. पूरन कुमार यांनी चंदीगढमधील सेक्टर ११ येथील त्यांच्या राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. पूरन यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पूरन यांचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली आहे.

वाय. पूरन यांची पत्नी आयएएस अधिकारी आहे. त्यांच्या पत्नी सध्या मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्याबरोबर जपान दौऱ्यावर गेल्या आहेत. सैनी यांच्याबरोबर वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ जपान दौऱ्यावर गेलं असून पूरन यांच्या पत्नी या शिष्टमंडळातील सदस्य आहेत. पूरन यांनी आत्महत्या केली त्या ठिकाणी कुठलंही पत्र (सुसाइ़ड नोट) सापडलेलं नाही. पोलीस आता घटनास्थळाच्या आसपासचं सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.

या घटनेने हरियाणातील पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. पूरन कुमार हे २००१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी सोमवारी त्यांच्या गनमॅनकडून पिस्तूल घेतलं. मंगळवारी ते त्यांच्या घरातील बेसमेंटमध्ये (तळघर) मृतावस्थेत आढळले.

IAS पत्नी जपान दौऱ्यावर असताना उचललं टोकाचं पाऊल

हरियाणाचे सहाय्यक पोलीस महासंचालक वाय. पूरन कुमार यांची पत्नी अमनीत पी. कुमार या २००१ च्या बॅचच्या हरियाणा केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या नागरी उड्डाण विभागाच्या आयुक्त व सचिव आहेत. दरम्यान, पोलिसांनी सांगितलं की आम्ही सध्या वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्व संभाव्य शक्यता तपासून पाहात आहोत. लवकरच या प्रकरणाचा निष्पक्ष खुलासा केला जाईल.