Delhi High Court on Sameer Wankhede Plea Against Aryan Khan’s Bads of Bollywood : आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरूख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलिज एंटरटेनमेंटसह नेटफ्लिक्स आणि इतर पक्षांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शित केलेली वेबसीरीज ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ नुकतीच (१८ सप्टेंबर) नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. समीर वानखेडे यांनी दावा केला आहे की या सीरीजमध्ये त्यांच्यांसारखं दिसणारं एक पात्र दाखवण्यात आलं आहे. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

न्यायालयाने समीर वानखेडे यांना विचारलं की “हे मुंबईतील प्रकरण असताना तुम्ही ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात का दाखल केली? दिल्लीत याची सुनावणी अपेक्षित असेल तर कोणत्या आधारावर ही सुनावणी घेतली जावी त्याची कारणं विषद करा.” न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव म्हणाले, “राष्ट्रीय राजधानीत कारवाईची अपेक्षा का व्यक्त करत आहात?” बार अँड बेन्चने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ या सीरीजमधील चित्रण हे खोटे व बदनामीकारक असल्यामुळे त्याविरोधात मनाई आदेश देण्यात यावा, तसेच नुकसानभरपाईच्या स्वरुपात दिलासा मिळावा, अशी मागणी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्ययालयात केली होती. या वेबसीरीजवर बंदी घालावी आणि त्यांच्याशी संबंधित कथित दृष्य सीरीजमधून वगळावी अशी मागणी वानखेडे यांनी केली होती.

या वेबसीरीजवर बंदी घालावी आणि त्यांच्याशी संबंधित दृष्य सीरीजमधून वगळावी अशी मागणी वानखेडे यांनी केली होती. समीर ज्ञानदेव वानखेडे विरुद्ध रेड चिलीज एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी याचिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

यावेळी वानखेडे यांच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेले वकील संदीप सेठी म्हणाले, “दिल्ली आणि संपूर्ण भारतातीतल इतर प्रेक्षकही ही सीरीज पाहात आहेत. यातून माझ्या आशिलांची मानहानी करण्याचा प्रयत्न केला आहे.” यावर न्यायमूर्ती म्हणाले, “तुम्हाला तुमच्या याचिकेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तसेच हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात कसं ग्राह्य धरता येईल याबद्दल सविस्तर मुद्दे मांडा.”