जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही जरी वाढत असला, तरी करोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. मागील २४ तासांमध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

देशभरात मागील २४ तासांत २४ हजार ४७२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात तब्बल साडेसात लाख रुग्णांनी करोनावर मात केली आहे. देशातील बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ६३ टक्क्यांच्याही पुढे गेले आहे. देशभरातील १९ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात ६३.१३ टक्क्यांपेक्षाही जास्त रिकव्हरी रेट आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

भारतात २१ जुलैपर्यंत १ कोटी ४७ लाख करोना चाचण्यात करण्यात आल्या असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) देण्यात आली आहे. यामध्ये मंगळवारी करण्यात आलेल्या ३ लाख ४३ हजार २४३ चाचण्यांचाही समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत सर्वात जास्त चाचण्या करण्यात आलेल्या असून भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं आहे.

देशभरात जलद प्रतिद्रव नमुना चाचण्यांची संख्या वाढली असल्यानेही प्रतिदिन रुग्णांची संख्या वाढताना दिसते. मात्र, करोनाबाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांवर आणण्याचे प्रमुख लक्ष्य असल्याचे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. देशातील २३ एप्रिल ते २१ जुल या काळातील करोनाबाधितांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ८.०७ टक्के आहे. एकूण नमुना चाचण्यांपैकी करोनाबाधित नमुन्यांचे प्रमाण म्हणजे करोनाबाधित होण्याचा दर. मंगळवारी हे प्रमाण ११.१४ टक्के होते. गेल्या आठवडय़ात हे प्रमाण १० टक्के होते. दोन आणि चार आठवडय़ांपूर्वी ते अनुक्रमे ९.७ टक्के व ८ टक्के होते. ३० राज्यांमध्ये करोनाबाधित होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.