पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७ साली आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना केली होती. या परिषदेने आता भारतातील धार्मिक लोकसंख्येनुसार एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. मागच्या काही दशकांमध्ये भारतात लोकसंख्याशास्त्रीय दृष्टीकोनातून अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अहवालातील माहितीनुसार, १९५० ते २०१५ या काळात भारतात बहुसंख्य असलेल्या आणि प्रमुख धर्म असलेल्या हिंदूंच्या लोकसंख्येत ७.८ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तर त्याचेवळी आपल्या शेजारच्या राष्ट्रांमध्ये त्यांच्या देशातील प्रमुख धर्माच्या लोकांची संख्या वाढताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंदूंची लोकसंख्या घसरत असतानाच या अहवालात इतर धार्मिक गट जसे की, मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध आणि शीख यांच्याही लोकसंख्येची माहिती दिली आहे. हिंदूंसह जैन आणि पारशी या धार्मिक गटाचीही लोकसंख्या कमी झाली आहे. दरम्यान १९५० ते २०१५ या काळात मुस्लीम धर्मीय लोकसंख्येमध्ये ४३.१५ टक्क्यांची वाढ, ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्येत ५.३८ टक्के वाढ, शीख धर्मीय लोकसंख्येत ६.५८ टक्क्यांची वाढ दिसली आहे. तर बौद्ध धर्मीय लोकसंख्येत किंचीत वाढ नोंदविली गेली आहे.

भारताच्या एकूण लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा १९५० साली ८४ टक्के इतका होता. तो २०१५ साली कमी होऊन ७८ टक्क्यांपर्यंत कमी झाला. तर मुस्लीम धर्मीय लोकसंख्येचा वाटा १९५० साली ९.८४ टक्के इतका होता. मात्र त्यामध्ये आता वाढ होऊन ही संख्या १४.०९ टक्क्यांवर पोहोचली आहे.

विशेष म्हणजे भारतात हिंदूंच्या लोकसंख्येत ७.८ टक्क्यांची घसरण झाली असली तरी मान्यमारमध्ये हीच घसरण १० टक्क्यांच्या खाली आहे. तर नेपाळमध्ये हिंदूं समाजाची लोकसंख्या कमी होत असून त्यामध्ये ३.६ टक्क्यांची घट पाहायला मिळाली आहे.

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या आर्थिक सल्लागार परिषदेचा हा अहवाल मे २०२४ मध्ये प्रकाशित झाला आहे. जगातील १६७ देशांतील लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास करून सदर अहवाल तयार करण्यात आला होता.

या अहवालाचे बारकाईने विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भारतात अल्पसंख्याकांचे केवळ रक्षणच करण्यात येत नाही, तर त्यांची याठिकाणी भरभराटही होत आहे. भारतातील लोकसंख्याशास्त्रीय दृष्टीकोनातील महत्त्वाचे बदल आणि बाहेरील देशातील लोकसंख्येची आकडेवारी याबाबत या अहवालात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. लोकसंख्याशास्त्राच्या बदलाची आव्हाने आणि संधी या दोन्हींबाबत या अहवालात चर्चा करण्यात आली आहे.

या अहवालाला घेऊन भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी चिंता व्यक्त केली आहे. “हिंदूंची लोकसंख्या ७.८ टक्क्यांनी घसरत असताना दुसरीकडे मात्र मुस्मील धर्मीयांची लोकसंख्या ४३ टक्क्यांनी वाढली आहे. काँग्रेसने अनेक दशके राज्य केल्यानंतर आपली ही परिस्थिती झाली आहे. जर त्यांच्या हातात जर पुन्हा सत्ता गेली असती तर आज हिंदूंना राहण्यासाठी देश उरला नसता, अशी टीका मालवीय यांनी केलीय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu population witnesses 7 8 percent decline from 1950 ot 2015 says pm panel report kvg