संसदेत गैरहजर राहणाऱ्या खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फटकारले आहे. मी तुमच्यापैकी कोणालाही कधीही बोलावू शकतो, असा धाक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना संसदेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून १२ एप्रिल रोजी अधिवेशन संपणार आहे. मात्र लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमधील भाजप खासदार गैरहजर असतात असे समोर आले होते. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी हा मुद्दा मांडला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संसदेतील कामकाजात हजर राहणे ही खासदारांची प्राथमिक जबाबदारी असल्याचे मोदी म्हणाले. मी तुम्हाला कधीही बोलावेन अशी तंबीच त्यांनी खासदारांना दिली आहे. मोदींनी दांडीबहाद्दर खासदारांविरोधात कठोर भूमिका घेतल्याची ही पहिलीच वेळ आहे.

सोमवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात मंत्री अनुपस्थित असल्याने अनेक प्रश्नांना उत्तर देता आले नाही. तर प्रश्न विचारणारे खासदारही चर्चेदरम्यान गैरहजर होते. प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय राज्यमंत्री निर्मला सीतारमन आणि संजीव बलयान उपस्थित होते. पण या दोघांकडेही कॅबिनेट मंत्रिपद नाही. मंत्र्यांच्या गैरहजेरीवरुन काँग्रेस खासदारांनी राज्यसभा अध्यक्षांकडे तक्रार केली होती. जास्तीत जास्त मंत्री, कमी सुशासन असा टोलाही काँग्रेस खासदारांनी लगावला होता.

दरम्यान, संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यापूर्वी आदित्यनाथांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा केली. शेतकरी कर्जमाफीच्या विषयावर दोघांमध्ये चर्चा झाली. तसेच उत्तरप्रदेशमधील खातेवाटपावरही आज निर्णय घेतला जाईल असे सूत्रांनी सांगितले.